मुंबईहून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा..
बारामती : महान्यूज लाईव्ह
मुंबईहून बारामती तालुक्यातील मूर्टी येथे आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मूर्टीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून ग्रामस्थांनी नाहक घराबाहेर न पडता काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
बारामती तालुक्यातील मूर्टी येथे एक व्यक्ती मुंबईवरुन वास्तव्यास आली आहे. या व्यक्तीला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्याने त्याने गावातच तपासणी केली. मात्र निदान झाले नाही. त्यानंतर ही व्यक्ती मोरगाव येथे गेल्यानंतर त्याचा संशय आल्याने त्याची तपासणी करण्यात आली. आज या व्यक्तीचा तपासणी अहवाल आला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील हा तिसरा, तर एकूण संख्येत अकरावा रुग्ण आहे. या पार्श्वभूमीवर मूर्टीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घराबाहेर न पडता अधिकाधिक दक्षता घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.










