शिरुर : महान्यूज लाईव्ह
शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीस पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सतरा कमान चौक येथे गजाआड केले असून अटक केलेल्या आरोपीवर 16 गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.
या प्रकरणी अण्णा लक्ष्मण गायकवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७मे रोजी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक covid -19 च्या अनुषंगाने पुणे-नगर रोडवर पेट्रोलिंग करीत होते. तेव्हा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिक्रापूर पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोप अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय ३६ रा.घोडेगाव ता.नेवासा जि. अहमदनगर) हा सतरा कमान चौक येथे आलेला आहे.
यावेळी पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली असता घोडनदी पुलाजवळ संशयित व्यक्ती दिसला. पोलिसांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय ३६ रा. घोडेगाव ता. नेवासा जि. अहमदनगर) असे सांगितले. तसेच इथे का थांबला याबाबत विचारले असता, उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याचे जुने रेकॉर्ड पाहिले असता, त्याचेवर या पूर्वीचे एकूण १६ गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून शिक्रापूर पोलिसांचे ताब्यात दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहायक फौजदार दत्ता जगताप, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खडके, अक्षय नवले, प्रसन्न घाडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.










