दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई तालुका महसूल प्रशासनातर्फे रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी व 1 महिना पुरतील एवढी औषधे व इंजेक्शन्स उपलब्ध करून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या औषधाची बाजारातील किंमत अडीच लाख रुपये एवढी आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, त्यापैकी बरेच रुग्ण कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल होत असतात. त्यापैकी बरेच रुग्ण हे कोरोना विषाणू प्रादूर्भावाची मध्यम ते तीव्र लक्षणे असणारे व ऑक्सिजनची आवश्यकता असणारे असतात. अशा रुग्णांना ऑक्सिजन सोबतच आवश्यक असणाऱ्या औषधे व इंजेकशन्स यांची कवठे PHC येथील कोविड सेंटर मध्ये कमतरता असल्याने आमदार मकरंद पाटील यांनी आवाहन केले होते.
या आवाहनानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव यांच्या मागणीप्रमाणे आज वाई तालुका महसूल प्रशासनातर्फे रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी व 1 महिना पुरतील एवढी औषधे व इंजेकशन्स उपलब्ध करून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सदरची औषधे व इंजेकशन्स साठी लागणारी रक्कम ही वाई उपविभागीय अधिकारी कार्यालयातील व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच वाई तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटना त्याचप्रमाणे वाई तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांनी वर्गणी काढून जमा केली आहे.











