इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पळसदेव ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय पक्षाच्या पुढा-यांनी गावात अनेक वेळा औषध फवारले. मात्र दुसऱ्या लाटेचा कोरोना वाढल्यावर फवारणी होईना. कारण निवडणूक संपली होती.. त्यातच पंचक्रोशीतील वाड्या वस्त्यांवर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढीमुळे घबराटीचे वातावरण पसरले.
अशावेळी कोरोनाला रोखण्यासाठी व ग्राामस्थांना धीर देत तेथील युवकांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांवर प्रत्येक घरी जाऊन परिसरात औषध फवारणी केली.
गावात ग्रामपंचायतीच्या वतीने विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. मात्र नागरिक अद्यापही या कक्षात सहभागी होण्यास धजावत नाहीत. त्यामुळे गावातील कोरोनाची आकडेवारी अद्याप आटोक्यात येण्यास अडचणी होत आहे. विलगीकरण कक्षात नागरिकांसाठी अनेक सुविधा देऊनही समाधानकारक परिणाम झालेला पाहावयास मिळत नाही .
गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या आगोदर अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावात दोन तीन वेळा औषध फवारणी केली होती, मात्र आता गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढली असताना मात्र आता फवारणी होत नसल्याने पळसदेव येथील नागरिकांमध्ये नाराजी होती.
अशावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या सहकार्याने पळसदेव येथील अजित शिंदे, छगन बनसुडे, योगेश बनसुडे, सुनिल शिंदे, महेश बनसुडे, एकनाथ बनसुडे, रामदास पवार यांनी जास्त संसर्ग असलेल्या शिंदेवस्ती माळेवाडी येथे प्रत्येक घरी जाऊन स्वखर्चाने औषध फवारणी केली.
त्यांच्या या कार्याचे गावातून सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. अशाच प्रकारे गावातील दक्ष नागरिकांनी पुढाकार घेऊन कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आशा गावातील जाणकार व्यक्त करत आहेत.











