महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याची भीती व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे डीसीजीआय संस्थेने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लहान मुलांच्या चाचणीला परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारच्या एक्सपोर्ट कमिटीने या संदर्भात सरकारकडे शिफारस केली होती. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, अशी भीती व्यक्त करताना लहान मुलांच्या लसीकरणाला वेग आणावा व तशा स्वरूपाची कंपन्यांना परवानगी द्यावी अशी शिफारस केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या अंगीकृत संस्थेने म्हणजे डीसीजीआईने कोव्हॅक्सिनच्या चाचणीला ही परवानगी दिली आहे.
यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने देखील माहिती दिली असून, यामध्ये कोव्हॅक्सिन च्या 525 स्वयंसेवकांच्या चाचण्या करण्याची सरकारने परवानगी दिली आहे. आजच ही परवानगी दिल्यानंतर भारत बायोटेक ने देखील आम्हाला ही परवानगी मिळाली असून आम्ही लवकरात लवकर या चाचण्या करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.











