खंडाळा : महान्यूज लाईव्ह
खंडाळा तालुक्यातील नायगाव याठिकाणी ८ वर्षीय लहान मुलाचा खुनाचा उलगडा करण्यात सातारा गुन्हे अन्वेषण शाखा व शिरवळ पोलीसांना करण्यात यश आले. यामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातील रिओ श्वानाने कमाल केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, प्रवीण फडतरे, शरद बेबले या त्रिमूर्तीच्या नजरेने रिओ श्वानाच्या हालचालींचा वेध घेतला आणि अल्पवयीन मुलगा जाळ्यात अलगद अडकला.
सातारा पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये गळ्यावर व डोक्यावर वार केलेल्या ८ वर्षीय प्रशांत चन्नाप्पा जमादार या मुलाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले. या खून प्रकरणाचे कारण शोधत असताना केवळ वडिलांना नाव सांगतो याच एका किरकोळ वाक्याने खून झाल्याचे समजताच पोलीसांना आश्चर्याचा धक्का बसला.
याप्रकरणी पोलीसांनी १० वर्षीय मुलाला शिरवळ पोलीसांनी ताब्यात घेत सातारा येथील बाल न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्या अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्याचा आदेश दिला.
याबाबतची घटनास्थळावरील व शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नायगाव (ता. खंडाळा) याठिकाणी असणाऱ्या सुतारकी शिवारामधील (बिरोबा माळ) या ठिकाणी मूळचे कर्नाटक राज्यातील चन्नाप्पा जमादार हे कुटुंबीयांसमवेत प्रमोद गुजर यांच्या मालकीच्या शेतामध्ये शेतमजूर म्हणून कामासाठी आहेत.
सोमवारी, १० मे रोजी दुपारी ३ वाजता प्रशांत जमादार याला व अल्पवयीन १० वर्षीय मुलाला घरामधून रद्दी आणण्याकरिता पाठविले होते. यावेळी घरी गेल्यानंतर मृत प्रशांत जमादार व १० वर्षीय अल्पवयीन मुलामध्ये बोलणं झालं. घराला काही दिवसांपूर्वी लावलेली आग तूच लावली आहे, असे सांगत मी तुझे नाव पप्पांना सांगणार आहे असे मृत प्रशांत जमादार याने १० वर्षीय अल्पवयीन मुलाला सांगितले. यावेळी दोघांमध्ये या कारणावरून भांडणे होत झटापट झाली.
दरम्यान, त्यानंतर १० वर्षीय अल्पवयीन मुलगा हा घराजवळील शौचालयात शौचासाठी जात परत आला. पुन्हा मृत प्रशांत जमादार याने १० वर्षीय अल्पवयीन मुलाला पुन्हा तुझे नाव पप्पांना सांगणार आहे असे म्हणत अंगणातील कुऱ्हाड घेऊन पपईच्या बागेकडे निघाला. यावेळी १० वर्षीय अल्पवयीन मुलगाही प्रशांत जामदार याच्या मागे धावत जाऊन प्रशांत याच्या हातातील कु-हाड हातामधून हिसकावून घेताना ही कुऱ्हाड प्रशांत याच्या डोक्याला लागली.
दरम्यान,यावेळी डोक्याला कुऱ्हाड लागल्याने प्रशांत याने त्या अल्पवयीन मुलाला आता तर पप्पांना तुझे नाव सांगणारच, मला कुऱ्हाड मारली असे सांगितल्याने १० वर्षीय अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात पुन्हा सदरची कुऱ्हाड मृत प्रशांत जमादार याच्या डोक्यात मारत कुऱ्हाड जमिनीवर फेकली. यावेळी प्रशांत जमादार याच्या डोक्यात कु-हाडीचा घाव वर्मी बसल्याने चक्कर येत खाली कोसळला.
यावेळी कुऱ्हाडीचा पात्यावर मृत प्रशांत जमादार याचा गळा होता.ही कुऱ्हाड काढत असताना प्रशांत जमादार याच्या गळ्याला कुऱ्हाडीचा पाता लागल्याने गळा चिरला गेला. त्यानंतर सदरची कुऱ्हाड ही संबंधित मुलाने पपईच्या बागेमध्ये फेकून दिली. यावेळी घाबरलेल्या १० वर्षीय अल्पवयीन मुलाने घटनास्थळावरून धूम ठोकत तो मी नव्हेच ची भूमिका घेतली.
तत्पूर्वी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, प्रवीण फडतरे, शरद बेबले यांनी १० वर्षीय अल्पवयीन मुलाकडे विचारणा करण्यास सुरवात केली होती.
यादरम्यान, पोलीसांनी सातारा येथील रिओ श्वानाला व ठसेतज्ज्ञांना पाचारण केल्यानंतर रिओने घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळत विचारपूस करत असलेल्या १० वर्षीय अल्पवयीन मुलाकडे रिओ सातत्याने जात असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, प्रवीण फडतरे, शरद बेबले या त्रिमूर्तीच्या नजरेने घटनेचा वेध घेतला.
रिओ श्वानाच्या हालचालींचा वेध घेत अल्पवयीन १० वर्षीय मुलाला प्रेमाने जवळ घेऊन विचारपूस केली. पोलीस हवालदार प्रवीण फडतरे यांनी त्या अल्पवयीन मुलाला कवेत घेतल्यानंतर अश्रूचा बांध फुटला आणि अल्पवयीन मुलाने घडलेल्या घटनेची कबुली दिली.
यावेळी सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व शिरवळ पोलीसांना अवघ्या दोन तासांमध्ये गेल्यावर व डोक्यावर वार केलेल्या ८ वर्षीय प्रशांत चन्नाप्पा जमादार या मुलाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले. दरम्यान, संबधित अल्पवयीन १० वर्षीय मुलाला शिरवळ पोलीसांनी ताब्यात घेत सातारा येथील बाल न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्या अल्पवयीन १० वर्षीय मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्याचा आदेश दिला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे हे करीत आहे.











