सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
ऐन कोरोनाच्या काळात इंदापूर तालुक्यात आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली असताना, तहसीलदारापासून आरोग्य अधिकाऱ्यापर्यंतची पदे रिक्त असून त्यांचा पदभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. रूग्ण ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर आहेत हे मान्य; प्रशासकीय यंत्रणा देखील तशीच ठेवण्यात तू नेमके काय साध्य केले जात आहे असा प्रश्न उपस्थित होत असून यासंदर्भात ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी थेट मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे.
इंदापूर तालुक्यात मागील काही महिन्यांपासून तहसीलदारांचे पद रिक्त असून हा पदभार प्रभारी तहसीलदारांकडे आहे; तर इंदापूरचे मुख्याधिकारी हे पद देखील रिक्त असून, या ठिकाणी देखील प्रभारी अधिकारी पदावर आहेत. ज्या आरोग्य यंत्रणेच्या जीवावर सध्या कोरोनाची लढाई लढली जात आहे, त्या ठिकाणी देखील तालुका आरोग्य अधिकारी पद हे प्रभारी आहे.
या प्रभारी पदावर असलेले अधिकारी जीवतोड मेहनत घेत आहेत, परंतु आपत्तीच्या काळात सक्षम व पूर्ण अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना ही पदे प्रभारी का ठेवण्यात आले आहेत? असा प्रश्न ग्राहक संरक्षण परिषद सदस्य एडवोकेट तुषार झेंडे पाटील यांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना विचारला आहे.
एक तर ज्यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविला आहे, त्यांना पूर्ण अधिकार देऊन त्यांना त्या पदावर नियुक्त करावे, अथवा या ठिकाणी तिसरी लाट तोंडावर असताना प्रशासकीय यंत्रणा बळकट करण्यासाठी पूर्ण अधिकार असलेले अधिकारी नेमावेत व ही प्रक्रिया तातडीने करावी अशी मागणी झेंडे पाटील यांनी केली आहे.
ही तीनही पदे तालुक्याचे प्रमुख पदे असून याच्या व्यतिरिक्त अनेक पदेही रिक्त आहेत, परंतु या तीन पदावर सक्षम अधिकाऱ्यांची गरज असताना ती तातडीने नेमली जात नाहीत, यामागे नेमका हेतू काय आहे हे समजत नाही. प्रशासन उत्तम प्रकारे चालण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करावी अशी मागणी झेंडे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी तातडीने उत्तर पाठवले असून, यामध्ये दखल घेत असल्याचे नमूद केले आहे.











