सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पहिल्या लाटेत इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये २०० जणांना कोरोनाची लागण झाली.. दुसरी लाट किती भयावह आहे हे एव्हाना सर्वांनाच माहिती झाले आहे. इतरत्र तिप्पट, चौपटीने रुग्ण आढळले असताना इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये आतापर्यंत ४९ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी २९ जण सध्या अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. इंदापूर तालुक्यातील इतर मोठी गावे कोरोनाच्या बाबतीत हाराकिरी करीत असताना सणसरसारख्या मोठ्या गावात मात्र तुलनेने कमी रुग्ण आढळले आहेत, त्याचे कारण आहे गावात पूर्ण झालेले ६५ टक्क्यांपर्यंतचे लसीकरण! गावात मोठ्या प्रमाणात झालेल्या जनजागृतीमुळे गावात लसीकरण झाले आणि आता कोरोनाचे अल्प रुग्ण गावात आहेत.
सणसर हे इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या असलेल्या गावांपैकी एक गाव आहे. या गावात १८ वर्षापुढील पात्र लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ७२६ एवढी आहे. त्यापैकी ६ हडार २३१ जणांचे लसीकरण आजअखेर पूर्ण झाले आहे. गावातील एकूण लसीकरणाची मात्रा आता ६५ टक्क्यांपर्यंत पोचली आहे. गावात ग्रामस्थांनी वेळीच उपाययोजना म्हणून संस्थात्मक विलगीकरणाचा कक्षही सुरू केला आहे. मात्र यावेळी गावाला म्हणावे तेवढे कोरोनाने झपाटलेले नाही. लोकही मागील वर्षीच्या मृत्यूदराचा विचार करता कमीत कमी कालावधीत कोरोनामुक्त होऊन परतत आहेत.
नेमके काय केले गावाने?
ग्रामपंचायतीचे सरपंच रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितल्यानुसार गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. ज्यावेळी ४५ वर्षापुढील ज्येष्ठांमध्ये कोरोनाच्या लसीची भीती होती, त्यावेळी गावातील जास्तीत जास्त ज्येष्ठा्ंचे लसीकरण पूर्ण करून घेतले. त्यावेळी येथील केंद्रावर गर्दी व्हायची नाही. या काळात लसीकरण झाले. फ्रंट लाईन वर्कर्सची गावातील संख्या मोठी आहे. त्यांचेही लसीकरण पूर्ण करून घेतले. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणही वेगाने करण्यासाठी जनजागृती केली. वास्तविक पाहता सणसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत १६ गावे आहेत. या गावांतील नागरिकही येथेच लसीकरणासाठी येतात. त्यामुळे नंतरच्या काळात गर्दी वाढली. तोपर्यंत सणसरचे बऱ्यापैकी लसीकरण झाले होते. त्याचा काही प्रमाणात फायदा होताना दिसतो आहे.
अंदाजे ४ कोटींचे नुकसान टाळले..
सरपंच रणजितसिंह निंबाळकर, युवासेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ गुप्ते, माजी उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर, सणसर विकास मंचाचे रोहित निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे, व्यापारी संघटनेचे जगदिश कांबळे, भाजपचे मनोज पवार आदींशी चर्चा केली असता, या लसीकरणाचे महत्व त्यांनी सर्वांनी विशद केले.
सरपंच रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, जर दुसऱ्या लाटेची परिणामकारकता पाहिली, तर सणसर हे बारामतीच्या अगदीच जवळ आहे, त्याचा विचार केला, तर सणसरमध्ये आतापर्यंत चारशे ते साडेचारशे रुग्ण आढळू शकले असते. परंतु तसे झाले नाही. त्याचा विचार करता, तसे सणसरकरांचे या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंदाजे चार कोटींचे नुकसान टळले. याचे सर्वांना समाधान वाटले.
कोरोना झाला, मात्र काहीच फरक पडला नाही.
सणसर येथील औषध विक्रेते गणेश रायते यांनी लसीचे दोन्ही डोस फ्रंटलाईन वर्कर म्हणून अगोदरच घेतले होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. मात्र पहिल्या दिवसांपासून ते कोरोनामुक्त होईपर्यंतच्या कालावधीत एचआरसीटी मात्र काहीच वाढला नाही, घरी आरामात बरा झालो असे सांगितले. हे केवळ लसीमुळेच शक्य झाले असा दावा गणेश यांनी केला.
सुपर स्प्रेडर रोखले
प्रमोद पाठक हे आरोग्यसेवक आहेत. ते म्हणाले, सणसरमध्ये सुपर स्प्रेडर लोकांची संख्या अधिक होती. त्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करून घेतले. लसीकरणाविषयी असलेला संभ्रम दुर करण्यात प्रशासन व पदाधिकाऱ्याना यश आले आणि त्यामुळे लसीकरण वेगाने झाले. सणसरमध्ये फ्रंट लाईन वर्कर्सची संख्या अधिक होती. त्यांना लस मिळाल्याने प्रमाण वाढले. ज्यांनी लस घेतली होती, त्यांना कोरोनाची बाधा झाली नाही, मात्र त्या घरातील लस न घेतलेले बाधित झाले. त्यामुळे कोरोनाच्या लसीकरणाचा फायदा आम्ही लोकांना समजून सांगितला आणि त्याचा फायदाही झाला.











