राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड शहरासह तालुक्यातील पुर्व भागातील गावांमधील बेकायदा वाळू उपसा, मटका, जुगार, गावठी दारू, गुटखा असा व्यवसायिकांच्या मुसक्या अवघ्या दोन महिन्यात आवळल्या. भीमा नदीच्या पात्रातील बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर 15 गुन्हे दाखल करून 40 वाळू माफियांवर कारवाई करून तब्बल 4 कोटी 39 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही धडाकेबाज कामगिरी दौंडचे पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक मयुर भुजबळ यांनी अवघ्या दोन महिन्याच्या परिविक्षाधीन कालावधीत पूर्ण केली.
त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना आता दौंडचा सिंघम म्हणून ओळखले जात असून, त्यांचा धसका गुन्हेगारांनी घेतला आहे. आज मंगळवारी ( दि.11 ) त्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. अवघ्या दोन महिन्याच्या परिविक्षाधीन कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली गेल्याने सर्वसमान्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 28 मार्च रोजी मयूर भुजबळ हे म्हणून दौंड पोलीस ठाण्यात रूजू झाले. मयूर भुजबळ यांनी दौंड पोलिस स्टेशनचा कामकाज सुरू करताच पहिले लक्ष्य केले, ते दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेकायदा व्यवसाय आणि हे धंदे करणारे व्यावसायिक!
त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करून हद्दीतील अवैद्य धंदा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सत्र बेधडक चालू केले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भीमा नदीपात्रात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर 15 गुन्हे दाखल करून 40 व्यक्तींच्या विरुद्ध मोठी कारवाई केली. यामध्ये 26 अवैध वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक फायबर बोटी व 8 वाहने पकडून तब्बल 4 कोटी 39 लाख रुपये किमतीचा माल जप्त केला. तसेच या यांत्रिक फायबर बोटी नदीपात्रात फोडून आणि बुडवून नष्ट केल्या तर 8 वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांवर महसूल कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई केली.
दौंड शहरातील अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर मोठी कारवाई करून तब्बल 7 लाख 30 हजार रुपयांचा गुटखा व विदेशी सिगरेट जप्त केल्या. शहरातील तीन जुगार अड्ड्यावर छापा घालून 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये पत्त्याचे क्लब, ऑनलाइन बिंगो मटका, कल्याण मटका अशा अड्ड्यावर छापा घालून दीड लाख रुपये किमतीचा माल जप्त केला.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील देशी विदेशी व हात भट्टी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करत 11 अड्ड्यावर छापा घातला. यात दोन मोठ्या गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या भट्ट्या फोडून नष्ट करण्यात आल्या. 11 व्यक्तींवर गुन्हे दाखल करून 2 लाख 85 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. अशा 31 मोठ्या कारवाई करून तब्बल 4 कोटी 51 लाख रुपये किमतीचा माल जप्त केला.
अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करत असताना कोरोना विषाणूचा विविध भागांमध्ये वाढता संसर्ग पाहता दौंड शहरामध्ये कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून, विना मास्क 1536 केसेस करुन 3 लाख 29 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दौंड शहरातील बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होऊनही काही अस्थापना बंद न केल्यामुळे सदर आस्थापनांवर कारवाई करून दंड वसूल केला. दौंड शहरातील दिलेल्या मुदतीत व्यतिरिक्त आस्थापना चालू ठेवून आदेशाची भंग करणाऱ्यांविरुद्ध तहसीलदार दौंड यांच्या व नगरपरिषदेच्या मार्फत 7 आस्थापना सील करण्यात केल्या.
कोरोना काळात आरोग्याच्या समस्या व उपास मारीची वेळ येऊ नये म्हणून ज्येष्ठ नागरिकांस पोलिसांची मदत हा अभिनव उपक्रम सुरू करून कोरोना लॉकडाऊन काळात दौंड शहरातील निराधार व ज्येष्ठ नागरिकांचे घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना अन्नधान्याचे किट व सॅनिटायझर मास्कचे वाटप केले.
दौंड शहरात मुस्लिम जनसमुदाय मोठ्या प्रमाणात असल्याने मुस्लिम धर्मातील पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू असून व सध्या कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव व लॉक डाऊन पाहता सदर मुस्लिम बांधवांची जागोजागी जाऊन, त्यांची विचारपूस करून, सदर काळात त्यांना शासकीय नियमांचे पालन करून सण कसा साजरा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
कोरोनाची साखळी कशी थांबवता येईल या दृष्टीने त्यांनी स्वतः दौंड शहरात येणाऱ्या महत्वाचे रोड या ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार तसेच होमगार्ड यांच्या मदतीने बॅरिकॅडींग करून फिक्स पॉईंट नाकाबंदी नेमून विनाकारण फिरणाऱ्या इसमांवर दंडात्मक कारवाई केली.
काम करत असताना पोलिस स्टेशनचे काही अधिकारी व अंमलदार हे कोरोना बाधित झाले. त्यांनी स्वतः कुटुंब प्रमुख या नात्याने जातीने लक्ष देऊन आजारी पडलेल्या अंमलदार यांना योग्य त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांची रोजच्या रोज विचारपूस केले व डॉक्टरांना योग्य तो उपचार करण्याबाबत सूचना दिल्या.
त्यावेळी कोरोनाबाधित अंमलदार यांना व त्यांच्या कुटुंबीयांना स्वतः जाऊन भेटून वेळोवेळी त्यांचे कोरणा रोगावर मात करण्यासाठी मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत मयुर भुजबळ यांनी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था लॉकडाऊन परिस्थिती अतिशय चांगल्या तऱ्हेने सांभाळून अवैध धंदा करणाऱ्या धंदेवाल्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. शहर व ग्रामीण भागातील लोकांनी मयूर भुजबळ यांचे कौतुक करून सन्मान केला.











