दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वरवंड आणि यवत येथे एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा प्रयत्न फसला, या प्रकरणी एका अल्पवयीन मुलास पाटस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती पाटस पोलिसांनी दिली.
पुणे सोलापूर महामार्गावर वरवंड येथील इंडिया – 1 कंपनीचे एटीएम मशीन आहे. हे एटीएम मशीन सोमवारी (दि. 10 ) रात्रीच्या सुमारास तोडफोड करून त्यामधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न काही अज्ञात चोरांनी केला. मात्र तोडफोड करून ही त्यातील पैसे चोरता न आल्याने हे चोर पसार झाले होते. या चोरांनी एटीएम मशीनचा दरवाजा उघडा असल्याने प्रवेश करून एटीएम मशीन चे मॉनिटर, कीपॅड, तसेच इतर साहित्यांची तोडफोड केली, तसेच याठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि हार्ड डिस्कची ही तोडफोड केली. मात्र, एटीएम मशीन मधील 36 हजार रूपयांची चोरी झाली नसल्याने ते सुरक्षित राहिले.
पाटस पोलीसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. अधिक चौकशी केली असता या अल्पवयीन मुलाने यवत येथील एटीएम मशीनची तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता असे निष्पन्न झाले. याबाबत इंडिया – 1 एटीएम कंपनीचे अधिकारी आशिष राजकिशोर श्रीवास्तव (रा. वाघोली पुणे ) यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीवरून पाटस पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस हवालदार प्रदीप काळे हे करीत आहेत.











