बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव कॉलनी (सातववस्ती, बारामती) येथील आजोबा व नातीचा नीरा डाव्या कालव्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला. पत्रकार कल्याण पाचांगणे यांचे चुलतभाऊ उत्तम नामदेव पाचांगणे व त्यांची नात समृध्दी विजय चव्हाण (रा. कुरकुंभ, ता. दौंड) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कुरकुंभ येथील १० वर्षीय नात समृध्दीला बारामतीत घेऊन येताना हा दुर्दैवी अपघात घडला. उत्तम पाचांगणे हे कुरकुंभवरून बारामतीकडे येत होते. ते बारामतीत पोचणारच होते. मात्र जवळचा रस्ता म्हणून त्यांनी त्यांची दुचाकी पाटस रस्त्यावरून निरा डाव्या कालव्यामार्गे तीन मोरी असलेल्या भागाकडे वळली. सातववस्तीतील घरी जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने व नेहमी त्या रस्ताने जात असल्याने त्यांनी हा रस्ता निवडला. मात्र या भऱाव्यावर तीन मोरीचा पूल आहे. या पुल ओलांडताना त्यांचा दुचाकीवरील नियंत्रण निसटले आणि दुचाकी त्यांना या पुलावरून पुन्हा दुसऱ्या टोकावरच्या भऱाव्यावर नेता आली नाही. दुचाकीसह ते दोघेही निरा डाव्या कालव्यात पडले.
निरा डाव्या कालव्याचे सध्या आवर्तन सुरू असल्याने ५०० क्युसेक्सपेक्षा अधिक पाणी व त्याचा प्रवाह अधिक असल्याने ते दोघेही पाण्याबरोबर वाहत गेले. ही घटना समजताच त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्यांच्या खिशातील कल्याण पाचांगणे यांच्या व्हिजीटिंग कार्डमुळे ते पाचांगणे यांचे ओळखीचे असावेत म्हणून त्यांना पाण्यातून बाहेर काढणाऱ्या स्थानिकांनी कल्याण पाचांगणे यांच्याशी संपर्क साधला व त्यानंतर ही ओळख पटली. या दुर्देवी घटनेने माळेगाव कॉलनी परिसरात शोककळा पसरली.











