दिल्ली : महान्यूज लाईव्ह
लॅन्सेट या जगप्रसिध्द आरोग्य नियतकालिकाने केंद्र सरकारने कोरोनाविरोधात लढ्याची रणनिती न बदलल्यास १ ऑगस्टपर्यंत देशात १० लाख लोक कोरोनाने मरतील असा इशारा दिला आहे, त्यानंतर कॉंग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारने थोडी लाज शिल्लक असेल, तर देशाची माफी मागावी व आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
लॅन्सेट हे जगप्रसिध्द नियतकालिक असून या नियतकालिकाने अभ्यास करून संपादकीय अग्रलेखात भारतातील कोरोनाच्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले आहे. देशाच्या विविध भागात आज कोरोनाची आज जी स्थिती झालेली आहे, त्याला सर्वतोपरी केंद्र सरकारची रणनितीच कारणीभूत असल्याचे मत मांडले आहे.
मागील चोवीस तासात देशात पुन्हा नव्याने चार लाखांहून अधिक रुग्ण आढळले, तर आतापर्यंतच्या कोरोनाच्या बळींमधील सर्वाधिक एका दिवसातील ४ हजार ९२ बळी आज गेले आहेत. ही आजवरची सर्वोच्च आकडेवारी आहे. विशेष म्हणजे हे बळी केवळ सरकारी सूत्रांच्या आकडेवारीचे आहेत. जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या कोणताच देश वास्तववादी देत नाही. अगदी तालुकास्तरावरही कोरोनाच्या मृतदेहांवरील अंत्यसंस्काराची संख्या वेगळी आणि सरकारी सूत्रांकडील आकडेवारी वेगळी असे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर पी. चिदंबरम यांनी मोदी सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरल्याचे सांगत थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशवासियांची माफी मागा अशी मागणी केली आहे.











