माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात सामाजिक काम म्हणून पै. धनेश डिंबळे यांनी आर्थिक वंचित घटकातील कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करून खऱ्या अर्थाने गोरगरीब लेकरांना मायेचा घास भरवला असल्याची भावना व्यक्त करत डिंबळे यांच्या कार्याचे इतर उद्योजकानी आदर्श घ्यावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी केले आहे.
नसरापूर ( ता. भोर ) व परिसरातील गरीब गरजुंना उद्योजक धनेश डिंबळे यांनी पत्रकारांच्या सहकार्याने अन्नधान्य किट वाटप केले. यावेळी देशपांडे बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, धनेश डिंबळे, तलाठी जे. डी. बरकडे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किरण भदे, उपाध्यक्ष वैभव भुतकर, सदस्य माणिक पवार, विजय जंगम, शरद भुतकर, सुहास कुलकर्णी, मोहन वाल्हेकर, दगडु हिलम आदी उपस्थित होते. यावेळी अन्नधान्याची किट वितरीत करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
पोलिस निरीक्षक देशपांडे यांनी बोलताना या उपक्रमाची प्रशंसा करुन धनेश डिंबळे या तरुण उद्योजकाने यासाठी सहाय्य केले, ही चांगली बाब असून पोलिस प्रशासनसुद्धा अशा उपक्रमांच्या नेहमी पाठिशी असेल अशी ग्वाही देत पत्रकार मित्रांनी यासाठी पुढाकार घेतला ही प्रशंसनीय बाब असल्याचे देशपांडे यांनी नमूद केले. पत्रकारांच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करता आली याचे मनापासून समाधान मिळत असल्याची भावना धनेश डिंबळे यांनी व्यक्त केली.
पत्रकार म्हणुन वावरताना समाजात अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे हे समजते मग यासाठी पुढाकार घेत समाजातील दानशुर व्यक्तीची मदत समाजातील गरजवंताना पोहचवण्याचे काम पत्रकार दोघांमधील माध्यम म्हणुन करतात अशातूनच असे उपक्रम पार पाडतात अशी भुमिका यावेळी पत्रकार किरण भदे यांनी स्पष्ट केली. लाभार्थ्यांनी योग्यवेळी मदत मिळाल्याचे सांगत आभार व्यक्त केले.
धनेश डिंबळे यांचे कार्य कौतुकास्पद..
धनेश डिंबळे यांच्या वतीने शिवरे गावात आरोग्य सदृढ रहावे यासाठी तब्बल ९०० आरोग्य किट वाटप केले असून नसरापूर परिसरातील गरजूंना अन्नधान्य किट वाटप केले आहे. त्यांच्या या कार्याची परिसरातून कौतुक होत आहे.











