सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पेट्रोलपंपावर बेसावधरित्या बसले असताना अचानक हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर छत्रपती कारखान्याचे संचालक अनिल बागल यांची बोटे तुटली. ती बोटे तशीच हातात घेऊन बागल यांनी भिगवणमधील डॉ. थोरात यांचा दवाखाना गाठला. दवाखान्यात पोचताच थेट डॉक्टर अजय थोरात व डॉ. प्राची थोरात यांच्यासमोर बागल उभे होते.. शर्ट रक्ताने माखलेला आणि हातात तुटलेली बोटे.. ती बोटे डॉक्टरांना दिली..आणि एका क्षणात डॉक्टरांनी परिस्थिती लक्षात घेत चपळाईने हालचाल केली. त्यानंतरच्या दोन तासात बागल पुण्यात पोचले होते..आणि त्यानंतरच्या दोन तासांत त्यांच्या बोटांची शस्त्रक्रिया सुरू झाली.. शस्त्रक्रिया यशस्वीही झाली.. पण थोडा उशीर झाला असता तर?…
भिगवणच्या डॉ. प्राची थोरात या मागील आठवड्यात पिंपळे (ता. इंदापूर) येथील बागल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरचा प्रसंग आठवून सांगत होत्या, तेव्हा अंगावर काटा उभा राहीला होता. बागल हे हल्ला झाल्यानंतर लगेचच तेथील एका मुलाला बरोबर घेऊन दुचाकीवरून भिगवणकडे निघाले आणि वेगाने पोचले. डॉ. थोरात हे त्यावेळी एका इमर्जन्सीच्या तयारीत होते. तेवढ्यात बाहेर गडबड झाली आणि काही समजून घ्यायच्या आत डॉक्टरांसमोर अनिल बागल यांनी हल्ला झाला आणि त्यात उजव्या हाताची बोटे तुटली, डोक्याला गंभीर जखम झाल्याचे सांगितले.
डॉक्टरांनी लागलीच परिस्थिती हातात घेत बागल यांच्यावर उपचार सुरू केले. ती बोटे पाच तासांच्या आत पुन्हा जुळवणे गरजेचे असल्याने त्या दृष्टीने पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर वाहिद अल्ताफ यांच्याशी संपर्क साधला. तेथील व्यवस्था केली. तोपर्यंत रक्त अधिक वाहिल्यास रुग्णाच्या प्रकृतीला धोका पोचू शकतो, त्यामुळे त्याचीही व्यवस्था केली.
पुण्यात बरोबर संध्याकाळी सहा वाजता बागल यांना घेऊन रुग्णवाहिका पोचली आणि साडेसात वाजता बागल यांची बोटे पूर्ववत यशस्वीरित्या जोडण्याची शस्त्रक्रिया पार पडली. डॉ. अजय थोरात, प्राची थोरात, डॉ. वाहिद अल्ताफ यांच्या या युध्दपातळीवरील प्रयत्नांमुळे बागल यांची तुटलेली बोटे जोडली गेली..!











