दौंड : महान्यूज लाईव्ह
शेतीच्या वादातून दौंड तालुक्यातील उंडवडी येथील भोसले वस्तीत पुतण्याने चुलत्यासह दोन चुलत भावांवर धारधार कोयत्याने हल्ला केला, या हल्ल्यात चुलत्याचा जागीच मृत्यू झाला असून दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.
जमिनीच्या बांधाच्या वादातून ही घटना आज घडली. भोसलेवाडी येथे गारुडी कुंटुबियांची शेती असुन पोपट व बापू गारुडी हे दोघे भाऊ आहेत. यातील पोपट गारुडी यांचा मुलगा अमित याने बापू गारुडी आणि त्यांच्या दोन मुलांना अगोदर अल्टो कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने चुलते बापू लक्ष्मण गारुडी व त्यांच्या दोन्ही मुलांवर जीवघेणा हल्ला केला. यात बापू गारुडी हे जागीच ठार झाले. बापू गारूडी यांचा मृतदेह यवत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेसंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी दिलेली माहितीचा व्हिडीओ
आरोपी अमित पोपट गारुडी याने यवत पोलीस ठाण्यात हजर राहून घटनेची कबुली दिली.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यवत पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान ऐश्वर्या शर्मा यांनी नागरिकांना कोरोनासारख्या संकटाच्या काळात पूर्ववैमनस्य बाजूला ठेवून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.











