मराठा आरक्षण रद्द : मराठा समाजातील युवकांना भवितव्याची चिंता
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यामुळे मराठा समाजातील युवकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्यांना आपल्या भवितव्याबाबतची चिंता लागली आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यामध्ये अपयश आले आहे,असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या नेतृत्वाने नेहमीच इतर समाजाला आरक्षण दिले आहे. त्यांना पाठिंबा दिला आहे. आता मराठा समाजातील युवकांना शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळणे अतिशय गरजेचे झालेले आहे.
मराठा समाजाचे दिलेले आरक्षण हे इतर कोणाचेही आरक्षण काढून दिलेले नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळणे अपेक्षित होते. आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजातील तरुण पिढीवर परिणाम होणार आहे. मराठा आरक्षणासाठी 58 हून अधिक मोर्चे शांततेत काढण्यात आले. अनेक मोर्चामध्ये आम्ही देखील सहभागी झालो होतो. तसेच मराठा आरक्षणासाठी राज्यातील सुमारे 50 हुन अधिक युवकांनी बलिदान दिलेले आहे. या युवकांनी मराठा आरक्षणासाठी दिलेले बलिदान वाया जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षण कायदा विधानसभेत मंजूर केला. त्यांच्याच काळात मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकून ठेवण्याची जबाबदारी सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारची होती. मात्र आजच्या निकालावरून राज्य सरकारने जबाबदारी गांभीर्याने पार पडलेली नाही, हेच दिसत आहे.
देशामध्ये 9 राज्यांमध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण आहे. केंद्र सरकारनेही सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे सुनावणी प्रसंगी नमूद केले होते. तरीही मराठा समाज आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेले नाही. ही घटना मराठा समाजातील युवकांसाठी अतिशय निराशाजनक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
राज्य शासनाने तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजासाठी शैक्षणिक, नोकरी व उद्योग व्यवसायासंदर्भातचे निर्णय आपल्याला असलेल्या अधिकारांमध्ये घ्यावेत व त्यांची बजेटमध्ये आर्थिक तरतूद करावी, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.











