इंदापूर : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रात मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागासलेला आहे म्हणून मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी असल्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रा. डॉ. जयश्री गटकुळ यांनी सांगितले.
डॉ.गटकुळ म्हणाल्या की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही गेल्या ३० वर्षापासूनची मागणी आहे. मात्र शासनाची उदासीनता याला कारणीभूत आहे. न्यायालयापुढे बाजू मांडण्यात सरकार अपुरे पडले आहे. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात नक्की कोण विरोध करत आहे आणि कोण फसवित आहे याबाबत चार कोटी मराठा समाजाला सत्य वास्तव जाणुन घेण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर निकषांमध्ये बसणारे मराठा आरक्षण असून ते अनपेक्षितपणे रद्द करण्यात आल्यामुळे ही बाब मराठा समाजावर अन्यायकारक आहे आणि निराशाजनक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला असल्याने मराठा समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. मराठा समाजाने लाखोच्या संख्येने सहभागी होत मराठा क्रांती मोर्चा काढला. तेव्हा शांतताप्रिय मराठा समाजाचा आदर्श साऱ्या जगात कौतुकास्पद ठरला होता. हे सर्व समाजाला माहीत आहे. शासन दखल घेत नसेल तर मराठा समाजाने एकत्र येवून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा द्यावा लागेल. असेही प्रा. डॉ. गटकुळ यांनी म्हटले आहे.











