दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आज कडक कारवाई करण्यात आली. विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर आणि दुकानदारांकडून सुमारे १६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाने नागरीकांना नियमांचे पालन करा असे वारंवार सांगितले, मात्र तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहेत.
नियम उल्लंघन करणाऱ्यावर मंगळवारी ( दि ४) यवत पोलिसांनी कडक कारवाई केली, यामध्ये विनामास्क फिरणाऱ्या ११ जण, दुकानदार, फळविक्रते असे ८ जण, विनाकारण फिरणारे पाच वाहनांवर असे एकूण 16 हजार रुपयांचा दंड वसूल करुन दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढेही यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये अशीच कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.











