वरकुटे पाटी ते आगोती नं 1 रस्त्याचे काम निकृष्ठ असल्याने ग्रामस्थांनी संतप्त होत काम बंद पाडले..
ग्रामस्थांची रस्त्यावरील खडी हाताचे उचकटत दर्जाहीन काम असल्याचा केला आरोप..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी ते अगोती नं.1 येथे तब्बल 25 वर्षांनी रस्ता मंजूर झाला. ज्या गावाला 25 वर्षानंतर रस्ता मंजूर होतो किंवा केला जातो, त्या गावातील लोकांना किती अप्रूप वाटत असेल? तसेच येथील लोकांना वाटले सुद्धा! पण कंत्राटदारांनी ज्या पद्धतीने कामाची ऐशी की तैशी केली आणि सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जशी डोळेझाक केली, ते पाहून लोक भडकले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री असलेल्या तालुक्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अशा अत्यंत निकृष्ट कामावरती मेहरबान कसे होतात? असा प्रश्न लोकांना पडला आहे. रस्त्यांसाठीचा निधी विकास कामांसाठी जमिनीतील एक कंत्राटदार जगवण्यासाठी आहे का असा प्रश्न लोकांना पडला असून, त्यामुळेच महाविकासआघाडीचा एक घटक असलेल्या शिवसेनेने ग्रामस्थांना बरोबर घेऊन रस्त्याचे काम बंद पाडले!
या जवळपास पंचवीस वर्षांनी होत असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असल्याची तक्रार करुनही ठेकेदाराने रस्त्याचे काम चालूच ठेवले. घाईघाईने ठेकेदाराने एका दिवसात दोन किलोमीटर पर्यंत रस्त्याचे काम उरकले. अखेर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हे चालू असणारे रस्त्याचे काम बंद पाडले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात उघडपणे होत असलेल्या कामाच्या दर्जाबाबत नागरीक रस्त्यावर उतरले.
जर हे काम पुन्हा असेच चालू ठेवले, तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. लॉकडाऊन काळात आमच्यावर कारवाई झाली तरी बेहत्तर! पण दर्जेदार रस्ता होण्यासाठी आमची कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्याने या रस्त्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.
या रस्त्याची खडी ग्रामस्थांनी अगदी हातानेच उकरुन दाखवत त्याचे चित्रीकरण केले. पंचवीस वर्षातून या रस्त्याचे डांबरीकरण होत असून एका दिवसामध्ये जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता ठेकेदाराने तयार केला आहे. पहिल्या डांबरी रस्ता न उकरता त्या रस्त्यावरच थेट काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कोणाला किती टक्केवारी जात आहे, त्यामुळे का निकृष्ट दर्जाचे चालले आहे? याची माहिती देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत त्यांनी ठेकेदाराला कामाच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाबाबत सुनावले होते असे ग्रामस्थांनी सांगितले.
हे काम बंद करावे असे सुचवले असता ते काम चालूच ठेवले गेले. इंदापूरच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता श्री. साळुंके यांना याबाबत मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी मी पुण्याला असून दोन दिवसानंतर इंदापूरला येणार आहे, तोपर्यंत ग्रामस्थांनी हे काम चालू ठेवावे, कामात अडथळा करू नये असे सांगितले.
मात्र तोपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल व आपले कसलेही ऐकले जाणार नसल्याची शक्यताही ग्रामस्थांना वाटली. हा रस्ता पाच, दहा वर्षे टिकेल असे दिसत नसल्यामुळे ग्रामस्थांनी आज आक्रमक पवित्रा घेत हे काम बंद पाडले व या कामाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केली. या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी परखडपणे प्रतिक्रिया दिल्या असून रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी केली आहे.
याबाबत शिवसेनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष नितीन शिंदे, इंदापूर शहराध्यक्ष महादेव सोमवंशी (मेजर) यांना तेथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निकृष्ट झालेल्या कामाची माहिती दिली. हे काम उत्तम दर्जाचे करावे अशी मागणी शिवसेना तालूकाध्यक्ष ॲड. नितीन शिंदे यांनी केली आहे.











