माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – भोर तालुक्यातील नसरापूर ( चेलाडी फाटा ) येथे वीज अंगावर वीज कोसळून आदिवासी कातकरी समाजातील दोन लहान मुली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेतील मयत झालेल्या मुलींच्या कुटुंबांना शासकीय प्रत्येकी चार लाख रुपये मदत तहसीलदार अजित पाटील यांनी जाहीर केली असून जातीचे दाखले आणि पक्की घरे कातकरी समाजातील लाभार्थ्यांना देण्यासाठी आदेश दिले आहे.
रविवारी झालेल्या घटनेत सीमा अरुण हिलम वय ११, अनिता सिंकदर मोरे वय ९ दोघीही रा. नसरापूर चेलाडी फाटा ( ता. भोर ) या शाळकरी मुली वीज कोसळून ठार झाल्या होत्या. चांदणी प्रकाश जाधव वय ९ ही किरकोळ जखमी झाली.
या पार्श्वभुमीवर भोर तहसिलदार अजित पाटील यांनी मृत कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे, सभापती दमयंती जाधव, उपसभापती लहूनाना शेलार, गटविकास अधिकारी विशाल तनपूरे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंद्देपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे, पोलीस हवालदार प्रमोद भोसले, सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी सदस्य संंदीप कदम, नामदेव चव्हाण, सुुधीर वाल्हेकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्र्वर झोरे, अनिल शेटे, ऋषिकेश खेडेकर आदी उपस्थित होते.
नसरापूर येथील झालेल्या दुर्घटना ठिकाणी तहसीलदार अजित पाटील यांनी पाहणी करून आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करणार असल्याचे सांगितले. यावेळी नामदेव चव्हाण व ज्ञानेश्र्वर झोरे यांनी येथील कातकरी समाजाला जातीचे दाखले मिळत नसल्याची बाब तहसीलदार अजित पाटील यांच्या समोर आणून दिली.
पाटील यांनी तत्काळ जातीचे दाखले देण्यासाठी जुन्या नोंदी व लागणारे पुरावे जमा तसेच त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेत कायम वास्तव्य करण्याचे सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. तर गटविकास अधिकारी विशाल तनपूरे यांनी या समाजातील ३० कुटुंबांना पंतप्रधान योजना आणि शबरी योजनेतून पक्के घरे मिळवून देण्यासाठी तातडीने प्रस्ताव करणार असल्याची माहिती दिली. सभापती दमयंती जाधव व उपसभापती लहूनाना शेलार यांनी मृत कुटुंबांना पंचायत समितीच्या वतीने वस्तू स्वरूपात प्रत्येकी २५ हजारांची मदत देणार असल्याचे सांगितले.











