नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. याचवेळी जनतेला आत्मनिर्भरतेची साद घालून स्वावलंबी भारत बनविण्याचा संकल्प आखला.
महात्मा गांधींनी खेड्याकडे चला ही घोषणा दिली होती. आज देशवासियांना कोरोनासंदर्भात मार्गदर्शनपर संवाद साधताना मोदींनी देखील खेड्यांमधील उद्योजकता, कौशल्य, ग्रामीण कुटीरोद्योग, नवयुवकांमधील नवसंकल्पनांना ताकद देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. कोरोनामुळे जग संकटात असले तरी कोरोनानंतरच्या संधीही खूप आहेत. त्या संधींचे सोने करण्यासाठी भारतीय जनतेला आत्मनिर्भरतेचा सल्ला त्यांनी दिला. याच भारताला एकेकाळी सोनेरी पक्षी किंवा सोन्याचा धूर निघणारा देश अशी ओळख होती, ती ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
या २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक पॅकेजमध्ये काय असेल याचा उलगडा झाला नसला तरी एखाद्या राष्ट्रीय संकटानंतर युरोपात बेलआऊट पॅकेजची घोषणा केली जाते. भारतात अशा प्रकारची घोषणा पहिल्यांदाच होत असून ती देखील भारताच्या जीडीपीच्या १० टक्क्यांपर्यंत आहे. यानुसार देशाच्या विविध वर्गांना यामार्फत आर्थिक सहकार्य मिळणार असून हे विशेष पॅकेज स्वावलंबी भारतच्या अभियानाला एक वेगळी गती देईल असे मोदींनी म्हटले आहे. स्वावलंबी भारत हा संकल्प सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये कुटीरोद्योग, गृहोद्योग, लघुद्योग यासह देशातील नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी आणि श्रमिक मजूरांचाही आर्थिक पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे, या पॅकेजसंदर्भात लवकरच सविस्तर माहिती देणार असल्याचे मोदींनी सांगितले.











