शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
पुणे : राज्याला सर्वाधिक लस पुरवठा देण्याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली होती. मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने सद्यस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती. पुण्यात लसीचा प्लांट असल्याने, येथे अधिक लस मिळायला हवी, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात मांडली.
त्याचबरोबर, सुरुवातीला तयार झालेली लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती. त्यामुळेच आता आपल्याला लसींची कमतरता भासत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विधान भवन येथे ध्वजारोहण केल्यानंतर प्रसार माध्यमांसोबत बोलताना अजित पवारांनी राज्यातील अनेक प्रश्नांवर भूमिका मांडली.
अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतला असून, तरी देखील राज्य सरकार भारत बायोटेककडून अधिक लसीचे डोस कसे मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या येथील नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण कसे होईल, यावर सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ‘सध्या देशात आणि राज्यात कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे कोरोनाबधितांचे प्रमाण वाढले. त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल,’ यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.











