बारामती : बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 368 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माळेगाव कारखान्याची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या श्री निलकंठेश्वर पॅनल चा पराभव करुन ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरू-शिष्याच्या जोडीने कारखान्यावर सत्ता मिळवली होती. त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर अजित पवार या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. मात्र, पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने त्यांची मनधरणी करावी लागणार आहे.











