`या भारतात बंधूभाव नित्य वसू दे..!
नाशिक- येथील झेप स्वयंसेवी संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पंचवटी येथील श्रीराम विद्यालयात राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला, त्यामध्ये 11 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
गेल्या सहा वर्षांपासून ही संस्था प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवते. शहरातील विविध महाविद्यालयांतील, विद्यालयांतील मुले यामध्ये सहभागी होतात.
आजही अकरा हजार विद्यार्थ्यांनी तालासुरात एकाचवेळी अनेक राष्ट्रभक्तीपर गीते गायली. राष्ट्रगीताबरोबरच ध्वजगीत, साने गुरूजींचे खरा तो एकचि धर्म, मंगेश पाडगावकरांची तू नव्या जगाची आशा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची या भारतात बंधूभाव नित्य वसू दे अशी अनेक राष्ट्रभक्तीपर गीते गायली गेली.
झेप संस्थेचे प्रमुख व माजी उपमहापौर गुरुमति बग्गा यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. यास महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह आमदार अॅड. राहुल ढिकले, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आदी उपस्थित होते.










