सातारा : महान्यूज लाईव्ह
देशात तिसरा टप्पा लॉकडाऊनचा सुरू झाला आणि दररोज वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने काळजात धस्स झालंय..परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. साताऱ्याने तर पाऊणशेचा टप्पा गाठला. हातावर पोट असलेल्यांचं कसे हाल होत असतील..पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतोय,. हसतोय आणि हसवतोयही..पण आतून तुटल्यासारखं वाटायला लागलंय. ही भावनिक पोस्ट आज अभिनेते किरण माने यांनी लिहीली आणि अभिनेत्यांच्या जगातही कोरोनाच्या लॉकिंग जगाची चर्चा सुरू झाली..!
उलट-सुलट, झुंड, गांधी विरूध्द गांधी या वेगळ्या पातळीवरची नाटक सादर करणारे तसेच दूरचित्रवाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको, लक्ष्मी वर्सेस सरस्वती अशा वेगळ्या मालिकांमुळे घराघरात पोचलेले अभिनेते किरण माने हे सध्या साताऱ्यात त्यांच्या घरी आहेत. दररोज ते कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून सोशल मिडीयातून लाईव्ह संवाद साधून चाहत्यांना उमेद देत आहेत. मात्र आता आतून तुटल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
एकूणच जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने स्तब्ध करून टाकले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाउनच्या स्थितीचा सामना करणारे श्रीमंतातील श्रीमंत देशही कोसळती आर्थिक स्थितीने चिंतेत आहेत. पोटाचा प्रश्न आणि श्रमिकांची घरी जाण्याची ओढीनं भारतात माणसं जीव धोक्यात घालून रस्त्यावर प्रवास करीत आहेत. आता लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यावर प्राधान्य आहे. मात्र दररोज परिस्थिती बिघडत चालली आहे. यावर किरण माने यांनी गांभिर्याने भाष्य केले असून भिती व्यक्त केली आहे.










