महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
बारामतीकर मा.दा. देवकाते यांच्या साहित्यातील एक कविता आज आठवली..
अरे हे असे जीवन जगण्यापेक्षा
मेलेलं बरं,
पण भिती वाटते मरणाची
म्हणून, थोडी थोडी पिलेलं बरं..
थोडी थोडी पिलेलं बरं…..
या कवितेच्या ओळी आजच का आठवाव्या?…तर अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आमचा `बेवडा` आज केंद्र व राज्य सरकारच्या कृपेने यथेच्छ पिला..पण पिण्यापूर्वी भल्या मोठ्या रांगेत शिजून मेला..! कोरोनाने अनेक अतर्क्य गोष्टी घडवून आणल्या..निश्चितच आणल्या..पण त्याच्याबरोबर ज्या बेवड्यांना आम्ही समाजातले वाईट वळणावरचे समजायचो, तो तर खरा अर्थव्यवस्थेचा कणा निघाला..अर्थव्यवस्था बुडते म्हणून दारुची दुकाने उघडण्याची अतर्क्य गोष्टही आम्हाला कोरोनाने शिकवली..म्हणूनच आज पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत दुकानांपुढच्या रांगांचा अन्वयार्थच बदलला..कालपरवा पर्यंत किराणा दुकानापुढे दिसणाऱ्या रांगा आज दारुच्या दुकानांपुढे दिसल्या..एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवत बेवड्यांनी दारूच्या बाटल्या मागवल्या..नोटाबंदीच्या काळात एटीएमच्या समोर जेवढ्या रांगा नव्हत्या, त्यापेक्षा कितीतरी जास्त अंतराच्या रांगा लागलेल्या दिसल्या. अर्थात आज मात्र बेवडा हा बेवडा नव्हता, तर तो ताट मानेने, निधड्या छातीने देशभक्ती दाखवतानाही दिसला..!
आज कोल्हापूरमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला..सुमारे पाच किलोमीटरच्या रांगा खास दारुसाठी पाहायला मिळाल्या. मुंबईत तर एकापलीकडे एका बिल्डींगपर्यंत लागलेल्या रांगा आणि पुण्यामध्ये पोलिसांनाच हस्तक्षेप करीत दुकान बंद करण्याची आलेली वेळ पाहून धन्य वाटले…कोरोनाने आम्हाला किती शिकवले..कितीतरी अजब-गजब दाखवले म्हणून अभिमानही वाटला! आता मात्र आमचा देश, आमच्या राज्याला गरीबीतून बाहेर काढणाऱ्या बेवड्यांविषयी अतिशय अभिमान वाटू लागला आहे. आता जर एखादा बेवडा मेला, तर त्याकडे दुर्लक्ष करणार नाही..सरकार जर सॅल्यूट ठोकत असेल, तर आम्हीही ठोकू..परवा एक बेवडा याच कवितेतल्या पुढच्या ओळी म्हणून गेला..
हे सर्व पाहून तुम्ही म्हणाल,
बरं झालं बेवडा मेला,
पण मित्रांनो, पिणारे म्हणतील..
आमचा जोडीदार गेला….!
तेव्हा मित्रांनो, आज पासून जर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा कुठं पडलेला दिसला, तर त्याला सुखरूप त्याच्या घरी पोहचवा, कारण देशाची अर्थव्यवस्था काही काळ त्याच्याच हातात राहणार आहे. आणि उद्यादेखील जर कोणी दारू आणायला जात असेल, तर टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवा, कारण अर्थातच तो अर्थव्यवस्था मजबूत करायला निघणार आहे.. आणि बेवड्यांनो, तुम्ही देखील एक लक्षात घ्या..तुम्ही अर्थव्यवस्था मजबूत केली म्हणून चकणा हेलिकॉप्टरमधून वरून टाकला जाईल अशा नादात राहू नका..तेवढी अक्कल बहुतेक सरकारकडे अजून शिल्लक आहे..!










