पोपटराव जगताप गुरुजी (पणदरे, ता. बारामती)
पणदर्याच्या पोपटराव जगतापांना अख्खा बारामती तालुका पोपट गुरुजी म्हणून ओळखायचा; मात्र पवारसाहेब त्यांना पोपट मास्तर म्हणून हाक मारत. एकदा सहज गुरुजींनी विचारले, तुमच्याकडे येणार्या इतर प्राथमिक शिक्षकांना तुम्ही गुरुजी म्हणता, मीदेखील त्यांच्यासारखाच प्राथमिक शिक्षक आहे, मला मात्र मास्तर म्हणता. असे का? यावर साहेबांनी मिश्किल उत्तर दिले, ते हाडाचे गुरुजी आहेत, तुम्ही राजकारणी गुरुजी आहात, म्हणून तुम्ही मास्तर.
मॅट्रिक पास
हे राजकारण पोपट गुरुजींच्या अंगात शिरले ते पवारसाहेबांच्या पहिल्या ६७ सालच्या विधानसभा इलेक्शनपासून. यापूर्वी राजकारण चालत असे गावातल्या ठराविक मोठ्या घरांतून, तालुक्याचे नेतृत्वही या गावागावातल्या मोठ्या घरांचेच व ठराविक पुढार्यांचेच ऐकत असे. पोपट गुरुजींचेच उदाहरण घ्या ना. गुरुजी मॅट्रिक झाले, त्यानंतर सोमेश्वर साखर कारखान्यात काहीतरी नोकरी मिळवावी, असे त्यांच्या मनाने घेतले. गावातल्या पुढार्यांना साकडे घातले. त्यांच्याबरोबर सोमेश्वर कारखान्यावर चेअरमनसाहेबांकडे गेले, चेअरमनसाहेब म्हणाले, तुमच्या गावात मॅट्रिक पास मुले असतील तर सांगा, त्यांना कारखान्यावर नोकरी देता येईल. सोबत आलेले गावातील पुढारी म्हणाले, नाही हो, आमच्या गावात एकही मॅट्रिक पास मुलगा नाही. जवळ उभे असलेले मॅट्रिक पास पोपट गुरुजी खुणेने सांगू लागले, अहो, मी मॅट्रिक पास आहे. त्यांनादेखील गावातील पुढार्यांनी दाबले आणि तेथून बाहेर नेले. बाहेर आल्यावर म्हणाले, तू मॅट्रिक पास आहेस असं सांगितलं असतं, तर तुझ्या एकट्याचं काम झालं असतं. बाकीच्या मॅट्रिक नापास पोरांनी काय करायचं? एकदा मॅट्रिक पास मुलं मिळत नाही कळलं की आपोआप मॅट्रिक नापासांनाही घेतील कामावर. पोपट गुरुजी काय समजायचे ते समजले.
नंतर प्राथमिक शिक्षक भरती सुरू झाली. मुलाखतीत एकच प्रश्न विचारत, मावळ तालुक्यात जाणार का? हो म्हणाले, की लगेच कामावर रुजू केल्याचे पत्र हातात मिळे. पोपट गुरुजी ही मुलाखत देऊन मावळ तालुक्यात कामावर रुजू झाले. वर्ष-दोन वर्षे तेथे काढल्यानंतर बारामती तालुक्यात कार्हाटी येथे बदलून आले. तेवढ्यात आली ६७ ची विधानसभा निवडणूक. गावातल्या पुढार्यांना धडा शिकविण्याची ही संधी पोपट गुरुजींनी सोडली नाही. आपला शिक्षकी पेशा सांभाळून शरद पवारांचा प्रचार करत राहिले. घराघरात जाऊन ही शिक्षक मंडळी शरद पवार हे कसे योग्य उमेदवार आहेत, हे सांगत असत. परिसरातील बड्या पुढार्यांची घरे सोडली तर सर्वसामान्य जनता मनाने शरद पवारांसोबत होती. पणदरे परिसरात १६ स्वातंत्र्यसैनिक होते, त्यामध्ये एकजण पोपट गुरुजींचे काका होते. हे सारेजण हिरीरीने काँग्रेसचे उमेदवार शरद पवारांचा प्रचार करीत होते. प्रतिस्पर्धी उमेदवार मोठा खर्च करीत होते. ट्रकचा ताफा असे, बारामतीत अखंड जेवणावळी चालू होत्या. लोक जेवत असत व आपापसात चर्चा करीत, हा पैसा आला कोठून? गावागावात सर्वसामान्य माणसांना दाबून ठेवणार्या गावपुढार्यांबद्दल राग होता. या निवडणुकीत लोकांनी या गावपुढार्यांना बाजूला केले आणि शरद पवारांना विजयी केले.
पोपट गुरुजी कार्हाटीला दररोज सायकलवरून जात असत. आपली बदली आपल्या जवळच्या गावात व्हावी, असे त्यांना वाटे. त्यांनी आपल्या काकांमार्फत शरद पवारांचे वडील गोविंदराव पवारांकडे यासाठी विनंती केली. त्यांनी शरद पवारांना सांगितले. शरद पवार पोपट गुरुजींना घेऊन पंचायत समिती कार्यालयात गेले. उपसभापती कार्हाटी गावाचेच होते, ते म्हणाले, यांना कार्हाटी येथे येऊन अजून वर्ष पण झाले नाही. लगेच बदली कशी करायची. शरद पवार म्हणाले, माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत कसलेही काम सांगितले नाही. हे काम सांगितले आहे, तेवढे करा. एवढे झाल्यावर पोपट गुरुजींची बदली त्यांच्या गावातच झाली.
एक कशाला, तीन खोल्या घ्या
यानंतर पोपट गुरुजी शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते बनले ते शेवटपर्यंत. गावात शाळेसाठी खोल्या बांधायच्या होत्या. दीड हजार रुपये लोकवर्गणी भरली की एक खोली मिळे. सगळ्या गावात फिरून कशी तरी तेवढ्या पैशांची तरतूद झाली आणि एक खोली बांधायचे ठरले. भूमिपूजनासाठी पवारसाहेबांना बोलावले. कार्यक्रमाला आल्यावर साहेबांनी विचारले, येथे शिक्षक ५ आहेत आणि एकच खोली बांधताय? पोपट गुरुजींनी उत्तर दिले, काय करणार? वर्गणी तेवढीच जमा झाली. पवारसाहेब म्हणाले, त्याची चिंता करू नका. त्यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना आवाहन केले. बबन कवठेकरांनी एक हजार रुपये दिले, बाळासाहेब गीतेंनी ५०० रुपये दिले. इतर आलेल्या मान्यवरांनी मिळून दीड हजार दिले. अशा प्रकारे एका खोलीचे भूमिपूजन करण्यासाठी आलेले पवारसाहेब ३ खोल्यांचे भूमिपूजन करून गेले.
सहकारातील झटापट
पोपट गुरुजी शिक्षक संघटनेत हिरीरीने काम करू लागले. त्यासाठीही पवारसाहेबांचा पाठिंबा मोठा उपयोगाचा ठरला. तालुका संघ, जिल्हा संघ, त्यानंतर राज्य संघटनेचा कार्याध्यक्ष अशा अनेक स्तरांवर त्यांनी काम केले. दोन दोन लाख शिक्षकांची उपस्थिती असणारी संघटनांची अधिवेशने आयोजित केली. पवारसाहेबही या अधिवेशनांतून मार्गदर्शन करत असत. पोपट गुरुजी शिक्षकांच्या पतसंस्थेवरही काम करत होते. या सहकारी संस्थेत काम करण्याचा अनुभव त्यांना दिला त्यांच्या गावातील विविध कार्यकारी सोसायटीने. त्याचे असे झाले,
बारामती तालुक्यातील बहुतेक सर्व सहकारी संस्था तेव्हा काकडे गटाच्या ताब्यात होत्या. पवारसाहेबांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितले, या सहकारी संस्था आपल्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्याशिवाय खर्या अर्थाने आपण सर्वसामान्य जनतेसाठी काम करू शकणार नाही. यानुसार पणदर्यातील पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांसह पोपट गुरुजींनी गावातील सोसायटी आपल्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सोसायटीच्या सभेत दोन संचालक कमी करण्याचा व त्याऐवजी पोपट गुरुजी स्वत: आणि अमरसिंह जगताप यांना संचालक म्हणून घेण्याचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूरही करून घेतला. त्यांना वाटले झाले आता. आपल्या सोसायटीच्या मीटिंगला बोलावले जाईल, याची ते वाट पाहत राहिले; परंतु अनेक मीटिंग्ज झाल्या तरी यांना बोलावणे येईना. शेवटी ते सोसायटीच्या सचिवाकडे गेले. त्यांना विचारले, ठरावानुसार आम्ही संचालक आहोत. सचिव म्हणाले, कसला ठराव? असा कसलाच ठराव झालेला नाही.
पोपट गुरुजींनी बारामतीला शरद पवारांकडे धाव घेतली. शरद पवार त्यांना घेऊन हिरेमठ वकिलांचा सल्ला घेण्यासाठी गेले. हिरेमठ वकील म्हणाले, संस्थेचे प्रोसिडिंग कुणाकडे आहे? पोपट गुरुजी म्हणाले, सचिवांकडे आहे.वकील म्हणाले, राव झाल्यावर ते प्रोसिडिंग ताब्यात घ्यायला हवे होते, न दिल्यास पळवून आणायला पाहिजे होते. ठीक आहे, आता संस्थेचे पोटनियम पाहिले पाहिजेत. पोपट गुरुजींनी पोटनियम हा शब्दच त्यावेळी पहिल्यांदा ऐकला. त्यानंतर माहिती मिळाली, संस्थेचे पोटनियम पुण्यात पाहायला मिळतील. आजकाल हे पोटनियम प्रिंटिंग केलेले असतात. त्यावेळी ते हाताने लिहिले असत. हे पोटनियम पाहण्यासाठी पोपट गुरुजी, व्हीडीआण्णा जगताप, हिरेमठ वकील आणि पवारसाहेब मोटारीने पुण्याला गेले. संबंधित कार्यालयात गेल्यावर संस्थेचे पोटनियम पाहायला मिळाले. त्यावेळी झेरॉक्सचीही सोय नव्हती. त्या कारकुनाने सांगितले, तुम्हाला हे उतरवून घ्यावे लागतील.फफ त्यावेळी हिरेमठ वकिलांनी पोपट गुरुजींना पोटनियम उतरवून घेण्यासाठी पुण्यातच थांबवले. तीन दिवस थांबून त्यांनी ते सर्व पोटनियमांचे पुस्तक उतरवून काढले. प्रत्येक पानावर त्या कार्यालयाचा अधिकृत शिक्का घेतला आणि पणदर्याला परत आले.
आता प्रश्न आला प्रोसिडिंगचा. पुन्हा एकदा सोसायटीच्या सभेत तोच ठराव मांडला आणि हिरेमठ वकिलांच्या सल्ल्याप्रमाणे सचिव ज्या वहीत लिहीत होते ती वही पळवली. ती वही घेऊन सगळे वकिलांकडे गेले. वकिलांनी वही पाहिली आणि म्हणाले, ही काही प्रोसिडिंग नाही, साधी वही आहे. याचा काही उपयोग नाही. सहकारात काम करणे किती अवघड आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव पोपट गुरुजींना या घटनेने दिला. यानंतर अनेक प्रयत्न करूनही ही सोसायटी या कार्यकर्त्यांना आपल्या ताब्यात आणता आली नाही; मात्र यातून सहकार क्षेत्रात काम करण्याचा मोठा अनुभव त्यांना आला. पुढच्या काळात त्यांच्या ताब्यात असलेल्या एका सहकारी संस्थेत विरोधक प्रोसिडिंग पळवून नेतील, अशी शंका आल्याने त्यांनी हीच युक्ती वापरली. विरोधकांनी सचिवाच्या हातातली वही पळवून नेली. पाच किलोमीटर गेल्यावर उघडून पाहिली. आपली चूक त्यांच्या लक्षात येईपर्यंत सोसायटीच्या सभेत गुरुजींना हवे ते ठराव मंजूर झालेले होते.
असे असले, तरी बारामती तालुक्यात सहकार क्षेत्रावर काकडे गटाचेच वर्चस्व होते. त्यामुळे जिल्हा बँकेवर काकडे गटाचाच प्रतिनिधी सतत विजयी होत असे. यामुळे गावोगावच्या कार्यकर्त्यांनी नव्या सोसायट्या मागायला सुरुवात केली. या नव्या सोसायट्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात आल्या. यानंतर काही वर्षांनी पवार गटाचा प्रतिनिधी जिल्हा बँकेवर जाऊ लागला. पणदरे या त्यावेळच्या एक गावात आणि आजच्या ६ ग्रामपंचायतींच्या परिसरात आज २१ विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. २२ दूध उत्पादक सहकारी संस्था आहेत, पतसंस्था व इतर सहकारी संस्था वेगळ्याच. या परिसरात आज या सर्व सहकारी संस्थांचे मिळून ७४ विद्यमान चेअरमन आहेत. दूधधंदा, पोल्ट्री किंवा ड्रीप याची माहिती शेतकर्यांना करून देण्याचे काम मात्र आप्पासाहेब पवारांनी केले. स्वत: हातात खडू घेऊन शेतकर्यांना पोल्ट्री व्यवसायाची माहिती करून देणारे ३ महिन्यांचे कोर्सेस घेतले. जर्सी गाई घेऊन दूधधंदा वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले. यामुळेच एकावेळी पणदर्यातून दररोजचे २७ हजार लिटर दुधाचे संकलन होत होते.
शिक्षक संघटनेत काम करत असताना पोपट गुरुजींना पवारसाहेबांना भेटण्याचा योग अनेकदा आला. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना सर्व राज्य कर्मचार्यांनी ५६ दिवस संप केला होता. प्राथमिक शिक्षक या संपातून एकोणिसाव्या दिवशी बाहेर पडले ते पवारसाहेबांमुळे. पवारसाहेबांनी त्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले होते. पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर हा शब्द पाळला. सरकारी कर्मचारी समाधानी असला पाहिजे, याची दक्षता पवारसाहेबांनी नेहमीच घेतली. शिक्षक तसेच राज्य सरकारच्या कर्मचार्यांना त्यांच्या काळात चांगल्या वेतनवाढी मिळाल्या. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना ज्या वेतनवाढी मिळतील, त्या आपोआप राज्य कर्मचार्यांना लागू होतील असा कायदाच त्यांनी केला. त्याचा लाभ आजपर्यंत राज्य सरकारच्या कर्मचार्यांना होत आहे. पोलिसांच्या ड्रेसमधील हाफपॅण्टची फुलपॅण्ट करण्याचा निर्यणही त्यांच्याच काळातील.
पवारसाहेबांनी अनेक पदांवर कामाची संधी पोपट गुरुजींना दिली. बारामती तालुका स्काऊट गाईड संघटनेचा अध्यक्ष म्हणून १२ वर्षांहून अधिक काळ पोपट गुरुजी काम पाहत आहेत. साहेबांच्या शिफारशीमुळे बारामतीमध्ये या संघटनेचे कार्यालय झाले. या संघटनेचे तालुकास्तरावर असलेले हे एकमेव कार्यालय. कोणतेही अनुदान नाही, प्रवासखर्च किंवा भत्ते मिळत नाहीत. सेवेचे व्रत घेऊन पोपट गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी ही संघटना चालवत आहेत. बारामती तालुका दूध संघावर ५ वर्षे संचालक म्हणून काम केले. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ५ जणांच्या तिकीट वाटप समितीत कामाची संधी मिळाली.
पवारसाहेब अनेकदा पोपट गुरुजींच्या घरी येऊन गेले. एकदा घरी आले त्यावेळी गुरुजींच्या वृद्ध आईवडिलांना आवर्जून भेटले आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला, मुलं नीट सांभाळतात का? पहिल्यांदा आले तेव्हा छपराचे घर होते. घरात असलेल्या चुलीवरच चहा करायला लागला होता. सारे घर धुराने कोंदटून गेले होते. त्या घरात बसून पवारसाहेबांनी चहा घेतला होता. त्यानंतर चांगले सिमेंट-काँक्रीटमधील घर बांधल्यावरही ते एकदा येऊन गेले. आपल्या जीवनात ही समृद्धी या प्रेरणादायी नेतृत्वामुळेच आली आहे, या जाणिवेने पोपट गुरुजी मनोमन धन्य होत होते.
संकलन : घनश्याम केळकर, बारामती मो. 9881098138











