चार पाहुणे आणि पोलीस बंदोबस्तात पार पडला मंगल परिणय..
बारामती : महान्यूज लाईव्ह
सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच समारंभ, उत्सवावर निर्बंध आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं हे निर्बंध आणले असले तरी विवाह समारंभात किमान दहा लोकांना परवानगी दिली जात आहे. परंतु बारामतीतील नगरसेविका अनीता जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते बबलू जगताप यांच्या पुढाकाराने केवळ चार पाहुणे आणि पोलिस बंदोबस्तात महात्मा फुले सोसायटीमध्ये कांचन जगताप आणि सुरज काकडे यांचा मंगल परिणय पार पडला. प्रशासनाकडून परवानगी असतानाही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याचे कौतुक होत आहे.
बारामतीतील महात्मा फुलेनगर येथील कांचन जगताप हिचा विवाह फलटण येथील सूरज काकडे यांच्याशी ठरलेला होता. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच त्यांच्या विवाहाची तारीखही ठरवण्यात आली. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विवाह करणार कसा असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच नगरसेविका अनीता जगताप आणि सामाजिक कार्यकर्ते बबलु जगताप यांनी प्रशासनाशी संपर्क साधत या विवाहाला परवानगी मिळवली. प्रशासनाकडून दोन्हीकडील पाच पाच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह उरकण्याची संमती मिळाली.
त्यानुसार येथील महात्मा फुले सोसायटीच्या आवारात केवळ चार पाहुणे आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. पोलीस निरीक्षक औदूंबर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांच्यासह अनीता जगताप, बबलू जगताप यांच्या उपस्थितीत हा मंगल परिणय सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या विवाहानंतर हे नवदांपत्य दुचाकीवरून फलटणला रवाना झाले.. कोणताही बडेजाव न करता पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले.











