मुंबई- महान्यूज लाईव्ह
पालघर येथील साधुंच्या घटनेनंतर वातावरण धार्मिकदृष्ट्या तापविणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बुलंदशहरमध्ये दोन साधूंची अमानुष हत्या होताच देशात राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र अत्यंत संयमीपणे योगींना उलटी चपराक मारली. योगींप्रमाणेच ठाकरे यांनीही योगींना फोन करून साधुंच्या हत्येबद्दल चिंता व्यक्त केली.
महाराष्ट्रात पालघरमध्ये दोन साधूंच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मंगळवारी दोन साधूंचे शव रक्ताच्या थारोळ्यात आढळले. ही घटना बुलंदशहरातील अनूपशहरनजिकच्या पगोना या गावात घडली असून तेथील शिव मंदिराच्या आवारात झोपलेल्या दोन साधूंवर सोमवारी रात्री उशीरा धारदार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली. या मंदिरात साधु जगनदास आणि सेवादास गेली पंधरा वर्षांपासून पूजाअर्चा करीत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांचा एका व्यसनी युवकाशी वाद झाला होता. त्यावरून पोलिसांनी घटनेतील आरोपी तरुण मुरारी उर्फ राजू याला अटक केली.
दरम्यान या घटनेनंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा केली, त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी नमूद केले की, मी आत्ताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन करतो.`
दरम्यान काही दिवसांपूर्वी पालघर येथे दोन साधूंची जमावाने अफवेवरून हत्या केली होती. त्यावरून योगींनी ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात धार्मिक वातावरण पेटले होते. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी बुलंदशहरच्या घटनेवरून परतफेड करीत चिंता व्यक्त केली.
छायाचित्र – बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील याच शिवमंदिराच्या परिसरात दोन साधूंची हत्या केल्याचे मंगळवारी उघड झाले.










