(कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या घरात बंदिस्त असलेल्या सर्वांसाठीच आयुर्वेद आणि पंचकर्म याची तोंडओळख व्हावी म्हणून गोल्ड मेडलिस्ट आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. हिमगौरी वडगावकर यांची लेखमाला) भाग -१
जनमानस आणि आयुर्वेद
आयुर्वेद या शब्दातच त्याची व्याख्या दडलेली आहे. आयुष्याचा वेद अर्थात निरोगी आयुष्य जगण्याचा दाखवलेला वैद्यकीय मार्ग ! प्राचीन काळापासून आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीत दीर्घायुषी भव असा आशीर्वाद दिला जातो.
हा आशीर्वाद सार्थ करून दाखवायचा असेल तर आयुर्वेदाचे साधे सोपे नियम पाळणे खूप गरजेचे आहे. मातर् बहुतेकदा आजारी पडणे अटळ ठरते, तेव्हा आपण वेगवेगळ्या पॅथींचा वापर करून उपचार घेतो. त्यातीलच एक पॅथी म्हणजे आयुर्वेद! आयुर्वेद ही तशी सर्वांना लागू होणारी उपचार पध्दत आहे. कारण यात असणारे शमन व शोधन हे दोन भाग शरीरशुध्दी व दिर्घायुष्यासाठी महत्वाचे ठरतात. शोधन म्हणजे शरीरशुध्दी होय. त्यासाठीचा पंचकर्म म्हणजे आयुर्वेदाने दिलेली अमुल्य देणगी आहे. या पंचकर्माने कित्येकदा अगदी त्वरीत आराम मिळतो. त्यामुळे आयुर्वेद म्हणजे उशीरा आराम मिळतो हा गैरसमज असल्याचे सिध्द होते. तर शमन म्हणजे औषधी उपचार होय. आयुर्वेदीक औषधांकडील वाढलेला कल हे या पॅथीचे महत्व दाखवून देतो.
या शमन व शोधन चिकित्सेपूर्वी आपण आरोग्य व दिर्घायुष्यावर बोलू. पूर्वीच्या काळी अगदी आपल्याअगोदरच्या दोन पिढ्यांकडे पाहिले तरी बरेच काही लक्षात येईल. किती साधी जीवनपध्दती होती. सर्वात पहिला नियम होता म्हणजे ब्रम्हमूहूर्तावर उठण्याचा..म्हणजे अगदी पहाटे साडेतीनची ती वेळ! त्या वेळेत उठून दिनचर्येला सुरूवात करणारे दिर्घायुषी होते, आहेत. आपण किमान सूर्योदयापूर्वी तरी उठले पाहिजे. सर्व नैसर्गिक विधी उरकल्यावर रिकाम्या पोटाने व्यायाम करावा. आंघोळीनंतर थोडी न्याहारी करावी. यात पौष्टिक पदार्थ असावेत. यानंतर दररोजचा दिवस सुरू करावा. म्हणजे जे दिवसभर घरकाम किंवा जो व्यवसाय, नोकरी करतो ती कामे करावीत. अर्थात बाहेर जाण्यापूर्वी नेहमी काहीतरी खाऊनच बाहेर पडावे. काम बैठ्या स्वरुपाचे असल्यास दर अर्ध्या तासाने उठून जरा पाय मोकळे करावेत. पित्त काळातच दुपारचे जेवण करावे. कारण ह्या काळातच भूक लागण्याचे स्त्राव तयार होतात. नंतर काही वेळात अन्नपचन करणारे स्त्राव तयार होतात. त्या अन्नाचा शरीरालाही उपयोग होतो. साधारण १२ ते १ वाजेपर्यंत सहा रसांनी युक्त जेवण असावे. दिवसभराचे काम आटोपले की घरी असा अथवा बाहेरून येत असाल तरी स्वच्छ हात- पाय- तोंड धुणे गरजेचे आहे. ही वेळ असते, ती चहा, कॉफी किंवा दूध घेण्याची अथवा एखादे फळ खाण्याची! तिन्ही सांजेला समई लावून शुभंकरोती म्हणावी. इतर स्तोत्रे म्हणावीत. याचा शरीर, मन व सभोवतालच्या वातावरणावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो. मनाची एकाग्रता वाढते. रात्री जेवण आठ वाजण्यापूर्वी व भुकेपेक्षा कमी करावे, ते हलके असावे. जेवण व झोपेच्या मध्ये २ तासांचे अंतर असावे. रात्री जास्तीत जास्त १० वाजता झोपावे. फार उशीर नको. झोप ७ तासांची असावी. आणखी एक गोष्ट झोपेसंबंधी, दुपारची वामकुक्षी असेल तर ती २० मिनीटांची असावी, ती देखील डाव्या कुशीवर. अन्नपचनासाठी हे गरजेचे असते. पण आजकाल सारेच नियम धाब्यावर बसवले जातात. विरुध्दार्थी अन्न खाऊ नये, पण आपण चवीने फ्रूट सलाड खातो. मिल्क शेक पितो. एक पचल्याखेरीज दुसरे अन्न खाऊ नये. अवेळी खाऊ नये.पण आपण हे पाळत नाही. पोटाची ओसंडून वाहणारी कचरापेटी’ करतो. ज्या त्या ऋतूतील फळे भाज्या खाव्यात. आपल्या आजूबाजूला पिकणारे खावे.ते आणि तेच शरीराला मानवते. मांडी घालून जेवावे. घास बत्तीस वेळा चावावा. जेवणापूर्वी हात धुवावेत. जेवण हा यज्ञ आहे, याचे भान ठेवले पाहिजे. मात्र अनेक साधे सोपे आचार आपण विसरतो, त्यातून मग अनेक कष्टसाध्य, असाध्य व्याधी होतात..हा आत्ताचा कोरोना सारखा विषाणूजन्य आजार चिकटण्याचे खरेतर काहीच कारण नाही. आयुर्वेदीक पध्दत अंगिकारली तर प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे तयार होईल, मात्र आपण हे विचारात घेत नाही आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. आयुर्वेद हे अथर्व वेदाचे उपांग आहे. यात आधी स्वास्थ्याचा विचार केलाय. मग व्याधींचा!
स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम!
डॉ. हिमगौरी वडगावकर, बारामती.
९८८१०६६८१६










