बारामती ः महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी आज गेला. माळेगाव येथील कोरोनाग्रस्ताचा आज पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाची कोरोनाची टेस्ट कालच पॉझिटिव्ह आली होती. त्यास किडनीचा विकार होता.
बारामती तालुक्यात कोरोनाने घेतलेला हा दुसरा बळी ठरल्याने तालुक्यात धास्तीचे वातावरण सुरू आहे. बारामती तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे ८ रुग्ण आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. एका रुग्णावर अद्याप उपचार सुरू आहेत. दरम्यान बारामतीत कोरोनाच्या विरोधातील लढाई यशाच्या मार्गावर असतानाच दुसरा बळी गेला आहे. मात्र प्रशासनाने माळेगाव येथील रुग्ण हा किडनीच्या विकाराने त्रस्त होता व त्यास पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते अशी माहिती दिली असल्याने काही अंशी बारामती तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. माळेगावच्या निमित्ताने मात्र ग्रामीण भागात पहिल्यांदाच कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.










