बारामती – लॉकडाऊनची प्रशासनाने पाळलेली तीव्रता, त्यास बारामतीकरांनी कटाक्षाने दिलेला प्रतिसाद यामुळे सात कोरोना रुग्णांवर पोचलेली बारामती आता हळूहळू कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. एकाच कुटुंबातील चारही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता बारामतीच्या नावावर तसा एकच कोरोनाचा रुग्ण उरला आहे. या रुग्णाने एकदा कोरोनातून मुक्ती मिळवली तर बारामतीचा पॅटर्न राज्याला दिशा देईल हे मात्र नक्की..!
बारामतीत २९ मार्च पासून सुरू झालेला कोरोनाचा दंश आता मिटण्याच्या मार्गावर आहे. बारामतीत एकूण सात जणांना ‘कोरोना’ची लागण झाली होती. यातील भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला, तर उर्वरित सहा जणांपैकी पाच जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली. कोरोनामुळे जो एकमेव बळी बारामतीत गेला, त्या भाजी विक्रेत्याच्या मुलगा, सून व नातवंडांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. एकीकडे पुणे जिल्ह्यात कोरोनाने विळखा घातलेला असताना बारामतीकर मात्र कोरोनावर यशस्वीरित्या मात करताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बारामतीतील आता एकमेव उरलेल्या रुग्णास न्यूमोनियाचं निदान झाल्यानंतर त्यास पुण्याला तपासणीसाठी पाठवलं होतं. ज्यामध्ये 14 एप्रिल रोजी या रुग्णास कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. अर्थात सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पुढील काही दिवसात हा रुग्णही कोरोनावर मात करेल अशी चिन्हे आहेत.
बारामतीकरांचा लढा..
कोरोनाची लागण बारामतीत सुरू होताच राज्याच्या कोरोनाविरोधात झुंजणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीनेही कंबर कसली. पवार यांच्या बारामतीने अशी आखणी केली की, यामध्ये ४४ प्रभागात एक पॅटर्न केला. ४४ झोन केले आणि ४४ पोलिस, ४४ स्वयंसेवक, ४४ विभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी अत्यावश्यक सुविधा घरपोच करण्यास सुरवात केली. अगदी आरोग्य सेवेपासून अन्नधान्य, दूध, भाजीपाला, फळे ते अगदी गॅस सिलेंडरपर्यंत सारे काही घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली. या पॅटर्नमधील स्वयंसेवकांखेरीज रस्त्यावर कोणीही येणार नाही अशी आखणी करण्यात आली आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली.










