मित्रांनो, सन १८९७ च्या प्लेगच्या साथीनंतर अतिशय वेगानं पसरत चाललेली ही कोरोनाची साथ आहे. संपूर्ण जगातील जवळपास १८० देशामध्ये या महाभयानक विषाणूने आपली दहशत माजविली आहे. हजोरोंचे बळी जात आहेत. कित्येक रुग्णही बरेही होत आहेत. हे सगळं उपचार करणाऱ्या सर्वच डॉक्टर मंडळींचे यश आहे. प्रसारमाध्यमातील सततच्या माहितीवरुन मनामध्ये भीती निर्माण होऊन नकारात्मक विचारांचे वादळ घोंघावू शकते. या लॉकडाऊनच्या काळात आपल्या खाण्या पिण्याबरोबरच आपल्या मनाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काळ कसोटीचा आहे आणि प्रसंग बाका आहे. बराचसा वेळ आणि काळ घरात स्वतः ला कोंडून घेणे माणसाला शक्य होत नाही.
आजवर ग्रामीण असो की, शहरी भाग..माणसांनी स्वतःला धावपळीत व्यस्त ठेवले आहे. अर्थात तरीदेखील कोरोनाच्या सद्यस्थितीत घरात थांबण्याशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. म्हणून स्वतः साठी आणि कुटुंबासाठी घरात कोंडून घेतलेलंच बरं आहे. माणसाचं मन हे जसं विचार करतं तसेच त्याकडून वर्तन घडतं. त्यामुळे भविष्यात पुढे काय होईल? अशा स्थितीत नकारात्मक विचारांनी मनाचा ताबा घेतला जाऊ शकतो. त्याचा परिणाम मनावर होऊन मानसिक विकार जडण्याची शक्यता आहे. त्यापासून प्रत्येकाने स्वतःला सावरायचे आहे. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे खूप मोठे असे संकट आहे. त्यातून आपण लवकरच बाहेर पडू असा सकारात्मक विचार केला तर मनस्वास्थ्य उत्तम राहू शकते. आज ना उद्या ही साथ आटोक्यात येईल. परंतु मनात खोलवर नकारात्मक परिणाम झाला तर तो दूर करणं अवघड होईल. त्यासाठी मनात म्हणजेच मेंदूत सकारात्मक विचारांचाच जन्म झाला पाहिजे. तरच या वाईट दिवसातून आपण चांगल्या प्रकारे बाहेर पडू. सगळ्याच व्यक्ती कणखर नसतात. काही कोमल आणि हळव्या मनाच्या असतात. सतत कोरोनाचा विचार केल्याने मनात एक प्रकारचा फोबिया निर्माण होऊ शकतो. कारण घरात असणारा प्रचंड असा मोकळा वेळ.रिकामे मन सैतानाचे घर असते. मनात नको ते वाईट विचार येतात. हा काळ आपल्या कसोटीचा, परीक्षेचा आहे. तरीसुद्धा मनावर संयम आणि नियंत्रण ठेवून पुढे जायचे आहे. आपल्याला लॉकडाऊनचा काळ नकोसा झाला असेल, कधी एकदाचे घराबाहेर पडू असे वाटत असेल पण परंतु इतिहासकाळात एक अत्यंत पराक्रमी महापुरूषाचा आदर्श आपल्यासमोर आहे आणि तो घेऊनच आपल्यालाही पुढे जायचे आहे.
छञपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या बाबतीत इतिहासात अशा प्रकारचा लॉकडाऊन झाला होता. मार्च १६६० मधील घटना आहे, त्या वेळी महाराज पन्हाळ्यात वेढ्यात अडकले होते. सिद्धी जोहरचा वेढा अत्यंत कडक झाला होता. गडावरील सगळी रसद बंद झाली होती. तसे पाहिले तर हा लॉकडाऊनच होता आणि हा काळ पाच महिन्यांचा होता. परंतु राजे हलबल झाले नाहीत. मनातून खचले नाहीत की दुःख करत बसले नाहीत. तल्लख बुद्धीच्या शिवाजी राजांच्या मनाला नकारात्मक विचार शिवला सुद्धा नाही. दुसरे कोण असते तर काय झाले असते? कल्पना करा, परंतु राजांनी अतिशय कणखरपणे, धाडसाने पन्हाळ्यातून बाहेर पडण्याची योजना आखली आणि ती यशस्वीही केली. आज आपण राजांचे वारस म्हणवून घेतो. शिवरायांनी एका दिर्घकाळ पर्यंत चालू राहू शकलेल्या युध्दावेळी पाळलेला तो एक प्रकारचा लॉकडाऊनच होता. मनावर कोणताही परिणाम न होऊ देता ,कठीण परिस्थितीतही संयमाने मार्ग काढत संकटावर धैर्याने मात केल्याचा हा इतका मोठा आदर्श आपल्यासमोर आहे. आपल्याला फक्त घरातच बसून कोरोनाशी लढायचे आहे. जर राजांना तुम्ही दैवत मानत असाल तर त्यांचा तो पन्हाळ्याचा लॉकडाऊन डोळ्यासमोर ठेवा आणि त्याप्रमाणे मन कणखर बनवा. कारण ही परिस्थितीही बदलेल आणि पुन्हा एकदा सुंदर आयुष्य आपल्या वाट्याला येईल, मात्र तोपर्यत आपल्या मनाला सांभाळा..!










