खांडज – बाळासाहेब तावरे यांनी माळेगाव कारखाना सक्षम करून ठेवला होता. गुरूशिष्यांनी खरेतर सभासदांच्या खिशाची व संस्थेचीही लूट केली. त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेले आहे, त्यामुळे यांचे कारनामे आम्हाला माहिती आहेत अशी टिका माळेगाव कारखान्याचे माजी संचालक प्रकाश देवकाते यांनी केली.
खांडज येथे निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचारानिमित्त झालेल्या सभेत देवकाते बोलत होते. यावेळी माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, सतीश खोमणे, अॅड. केशवराव जगताप, माजी उपसभापती डॉ. अनिल सोरटे, पोपटराव तुपे, नितीन शेंडे, बाजार समिती व द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सुनिल पवार, अशोक नवले, राजेंद्र गावडे यांच्यासह पॅनेलचे उमेदवार व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकाश देवकाते म्हणाले,आम्ही रंजन तावरे व चंद्रराव तावरे यांच्या बाजूने होतो. पाच वर्षात ४२ संचालक करू असे म्हणणारे हे दोघे सर्रास खोटे बोलतात. माळेगाव कारखाना सन १९५१ मध्ये नोंदणी होऊन १९५६ मध्ये सुरू झाला. आज जे प्रचारात आपण लोकांनी गुरे विकली, दागिने मोडले असे सांगतात, त्यावेळी त्यांचे वय अवघे १४ वर्षे होते. ते कोठे सराफांकडे, बाजारात गेले नाहीत, ज्यांनी गुरेढोरे विकायची, त्यांनी विकली. त्यांनी वेदना सहन केला. यांनी फक्त सभासदांना उल्लू बनवून केवळ डल्ला मारण्याचेच काम केले. खरेतर बाळासाहेब तावरे यांनी अध्यक्षपद सोडून जेव्हा निवडणूक झाली व पराभव झाला, त्यावेळी कारखान्यात १०.७५ लाख पोती साखर शिल्लक होती. बाळासाहेब तावरे यांच्याविरोधात आरडाओरडा करून यांनी जेव्हा २६०० रुपये साखरेचे दर होते, तेव्हा साखर विकू दिली नाही. नाही नाही ते आरोप केले. मात्र जेव्हा हे सत्तेवर आले, तेव्हा पहिल्या महिन्यातच यांनी साखर विकली, साखर विकली ती देखील १८५० रुपये प्रतिक्विंटल दराने विकली. संचालक मंडळातील अनेकांना रस्त्यातच समजले की, साखर विक्री झाली. मग बाळासाहेब भाऊंना का विरोध केला होता? खरेतर बाळासाहेब तावरे यांनीच कारखाना सुस्थितीत आणला. तेव्हा कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगली होती. भरपूर साखर, भुस्सा, अल्कोहोल शिल्लक होते. सभासदांना कोणतीही तोशिस लागू न देता विस्तारीकरण करणार असल्याचे नव्या अध्यक्षांनी सांगितले, कारण बाळासाहेब तावरे यांनी ही संस्था सक्षम करून ठेवली होती. खरेतर या गुरूशिष्यांनी सभासदांच्या खिशाची लूट केली आहे. यांच्याबरोबर आम्ही काम केलेले आहे, त्यामुळे यांचे कारनामे आम्हाला माहिती आहेत. हे जरी सहकार बचाव असे ओरडत असले तरी सहकारी असलेल्या व सहकारातून निवडून दिलेल्या आठ जणांना जेव्हा यांनी अपात्र ठरवले, तेव्हाच त्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला.
अॅड. रवींद्र माने म्हणाले,ज्येष्ठ नेते शऱद पवार यांनी माळेगाव कारखान्याला सातत्याने मदत केली. अगदी कर्नाटकातील प्रसंग देखील पुरेसा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री विरप्पा मोईली यांनी केवळ माळेगाव कारखान्याच्याच टोळ्यांना परवानगी दिली. अनुदानाचा विषय असो की, अन्य कोणत्याही परवानग्यांचे विषय असो, पवारसाहेबांनी सातत्याने मदत केली. अजितदादांनी व सुप्रियाताईंनी सातत्याने या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
अॅड. रवींद्र माने यांनी संचालक पदासाठी असलेल्या सर्व उमेदवारांची ओळख करून दिली. मिथुन आटोळे या अपक्ष उमेदवाराने निळकंठेश्वर पॅनेलला पाठींबा दिला. यावेळी आटोळे यांनी ही निवडणूक प्रपंचाची
असून सत्याची लढाई आहे असे सांगून निळकंठेश्वर पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन केले.










