बोरकरवाडी आणि पिसर्वे येथे प्रचाराचा धडाका; आरोप-प्रत्यारोप टाळून विकासाच्या मुद्द्यावर भर देण्याचा निर्धार
बारामती : सोमेश्वर कारखाना ही केवळ एक संस्था नसून हजारो शेतकरी सभासदांच्या घामातून उभा राहिलेला सहकाराचा भक्कम वारसा आहे. ही संस्था योग्य नियोजन, आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेने सक्षमपणे कशी चालवायची, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आम्ही कोणावरही वैयक्तिक टीका वा आरोप-प्रत्यारोप करणार नसून कारखान्याची आर्थिक ताकद आणि शेतकऱ्यांचे हित वाढवण्यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी व्यक्त केला.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी बोरकरवाडी आणि पिसर्वे येथे शेतकरी व सभासदांशी संवाद साधत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी दोन्ही गावांत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. उपस्थितांशी संवाद साधताना जय पवार म्हणाले, मी येथे आल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांचा उत्साह आणि डोळ्यांतील भाव पाहिले, तेव्हा मनात दादांबद्दल असलेले अथांग प्रेम आणि आदर स्पष्ट दिसत होता. जनतेचा हाच विश्वास आणि प्रेम ही आमची खरी ताकद असून, त्यातूनच आम्हाला काम करण्याची नवी ऊर्जा मिळते.
निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली की, काही दिवसांपूर्वी झालेल्या घडामोडींदरम्यान वहिनीसाहेब, मी आणि पार्थदादा अशा सर्वांचाच असा विचार होता की, महायुतीच्या माध्यमातून नव्या-जुन्या चेहऱ्यांना सोबत घेऊन एक सर्वसमावेशक पॅनल उभे करावे. मात्र, आता निवडणूक लागल्यानंतर सभासदांपुढे आपली विकासात्मक भूमिका मांडणे आणि त्यांच्या कौलाचा आदर करणे हेच आमचे कर्तव्य आहे.
स्वतःच्या व्यावसायिक अनुभवाचा दाखला देत ते म्हणाले, मी स्वतः उद्योग-व्यवसाय हाताळत असल्यामुळे संस्था कशी चालवावी, आव्हानांवर कशी मात करावी आणि आर्थिक नियोजन कसे ठेवावे, याची मला स्पष्ट जाण आहे. सोमेश्वर कारखाना हा कोण्या एका व्यक्तीचा नाही. तो सभासदांच्या हक्काचा आहे. कारखान्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन भविष्यातील स्पर्धेत अव्वल ठेवण्यासाठी आणि उसाला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी आमच्या पॅनलला पूर्ण बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.










