शिरूर महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून शिक्रापूर व शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मोटारसायकल असा एकूण २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक भिमराव दांडगे (वय २५) असे नाव आहे.
शिरूर व शिक्रापूर परिसरात होणाऱ्या घरफोडीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळे, गुन्ह्यांची वेळ आणि आरोपीची कार्यपद्धती याचा अभ्यास केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कविठा परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने शिक्रापूर आणि शिरूर परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपीकडून शिक्रापूर,शिरूर पोलीस ठाण्यातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीचे सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण २४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात एकूण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक फौजदार संजय पडवळ, पोलीस हवालदार तुषार पंदरे, जनार्दन शेलके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील व पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ
तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहायक फौजदार धनंजय थेऊरकर, पोलीस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, अमोल नलगे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र निचित, नारायण वाळके, राम जाधव, भारत भोसले आणि पोलीस अंमलदार अस्मिता जोंधळे यांच्या पथकाने केला.










