रेल्वे प्रकल्पाच्या कामांना वेग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याच्या सूचना
मुंबई, दि. २ : बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडणार असून, येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रेल्वेसाठी आवश्यक तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आता डिसेंबरअखेर बीड-मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ‘अहिल्यानगर- बीड- परळी’ रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा तसेच बीड-पुणे आणि बीड-मुंबई रेल्वे सेवांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी १७ सप्टेंबरपर्यंत बीड-पुणे रेल्वे सेवेसाठी उर्वरित तांत्रिक, प्रशासकीय आणि सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. तसेच डिसेंबरअखेर बीड-मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून संबंधित कामांचा कालबद्ध आराखडा तयार करावा आणि सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अजितदादांच्या प्रयत्नांना यश..
बीड आणि मराठवाड्याच्या रेल्वे जोडणीसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे अहिल्यानगर-बीड-परळी या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती मिळाल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. गतवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी, १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू झाली. बीडकरांची सुमारे चार दशकांची प्रतीक्षा त्यावेळी संपली. आता याच ऐतिहासिक दिवशी बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याच्या दिशेने पाऊल पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे, पश्चिम महाराष्ट्राशी थेट कनेक्टिव्हिटी..
बीड-पुणे रेल्वे सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्याला पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट रेल्वे जोडणी मिळणार आहे. या रेल्वेमुळे कृषी, उद्योग, शिक्षण, व्यापार आणि सामाजिक क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होण्यास मदत होणार असल्याने जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
मुंबई रेल्वेचे डिसेंबरचे लक्ष्य..
बीड-पुणे रेल्वे सेवेनंतर डिसेंबरअखेर बीड-मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक कामांना गती देऊन प्रत्येक कामासाठी कालमर्यादा निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी होणाऱ्या बीड-पुणे रेल्वेच्या शुभारंभाची तयारीही नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. “बीड-पुणे आणि पुढे बीड-मुंबई ही केवळ रेल्वे सेवा नसून बीडच्या विकासाला जोडणारी नवी जीवनवाहिनी आहे. दिवंगत अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीत या रेल्वे जोडणीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता (निर्माण) बी. के. सिंह, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता व्ही. पी. पैठणकर, सीसीएम डॉ. सुमंत देऊळकर, विल्यम केरी यांच्यासह रेल्वे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.










