शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी व आंधळगाव येथे एकाच दिवशी दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
पिंपळसूटी येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका बिबट्याने लहान चिमुकलीवर हल्ला केल्यानंतर तिचा त्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर ही परिसरात बिबट्याचे दहशत कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंपळसूटी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतली असून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याबरोबरच इतर बिबटे पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू ठेवली आहे.
गेल्या बारा दिवसात पिंपळसूटी येथे एकूण ४ बिबटे जेरबंद करण्यात यश आले आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी पिंपळसूटी येथील शेतकरी रामदास काळे यांच्या शेतात वन विभागाने बिबट्या जेरबंद केला होता पुन्हा त्याच शेतात वन विभागाने आज पहाटे एक बिबट्या जेरबंद केला आहे. पिंपळसूटी परिसरात नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाची मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरूच आहे. एकूण चार बिबटे हे पिंपळसूटी गावातच गेल्या बारा दिवसात पकडले गेले असल्याने या भागात आणखी बिबटे किती हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान आज सकाळी पिंपळसूटी पाठोपाठ आंधळगाव येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाने जेरबंद केलेले दोन्हीही बिबटे माणिक डोह येथील बिबटनिवारण केंद्र येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हे बिबटे पकडण्याकामी शिरूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनपाल भानुदास शिंदे, वनपाल रुपाली जगताप, वनरक्षक शेखर जान गवळी, जालिंदर सानप, रेस्क्यू टीमचे सुधीर शितोळे, शरीफ शेख, मनोज चौधरी, गोविंद शेलार, अमोल पाटोळे,रोहिदास शेंडगे, सुनील कळस्कर, शरद गदादे, संदीप गव्हाणे, राहुल अवचिते, यांनी परिश्रम घेतले.पिंपळसूटी येथील शेतकरी राजेंद्र काळे,नवनाथ थोरात, सुरेश चव्हाण,शहाजी मोहिते, जालिंदर मोहिते आदींनी सहकार्य केले.










