भवानीनगर : सणसर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सुशील निंबाळकर यांचे महत्त्वाचे कागदपत्रे आणि ९ हजार रुपये असलेले पाकीट हॉटेलमध्ये सापडल्यानंतर हॉटेल व्यावसायिकाने ते प्रामाणिकपणे परत केले. किरण उर्फ सोनू पाठक आणि त्यांची आई संगीता पाठक यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरातून कौतुक होत आहे.
सुशील निंबाळकर हे सणसर इरिगेशन बंगला येथील हॉटेल साईनाथ येथे संध्याकाळी चहा घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून पाकीट खुर्चीच्या खोबणीत पडले. मात्र, याची त्यांना कल्पना आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भवानीनगर कॉलेजला कामावर जाण्यासाठी कपडे बदलताना खिशात पाकीट नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दरम्यान, सकाळी हॉटेल उघडल्यानंतर हॉटेलचे मालक सोनू पाठक आणि संगीता पाठक हे खुर्च्या व टेबलांची मांडणी करत होते. त्यावेळी संगीता पाठक यांना एका खुर्चीच्या खोबणीत पाकीट आढळून आले. पाकीट तपासले असता, त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड यांसह इतर महत्त्वाची कागदपत्रे आणि तब्बल ९ हजार रुपये असल्याचे दिसून आले. काही वेळातच सुशील निंबाळकर यांनी हॉटेल मालक किरण पाठक यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पाकीट हॉटेलमध्ये सापडल्याचे पाठक यांनी सांगितले.
त्यानंतर किरण पाठक आणि संगीता पाठक यांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रकमेसह संपूर्ण पाकीट सुशील निंबाळकर यांच्याकडे प्रामाणिकपणे सुपूर्द केले. यावेळी यजुवेंद्रसिंह निंबाळकर, रणजीत राजेभोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सापडलेले पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे परत करून पाठक कुटुंबीयांनी समाजासमोर प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवला.










