सुनील जोशी, पुणे
झेन जी मंडळीनी एक लढाई जिंकली याचा अनेकांना खूप राग ही आलाय आणि ते अस्वस्थ ही झालेलेत. जिंकणारी मंडळी आपलीच, आपल्या अवतीभोवतीची आहेत, त्यांनी जिंकलेली लढाई त्यांच्या खंबीर मनोवृत्ती, पूर्व तयारी आणि फोकस्ड ऍक्शनची आहे. त्यांच्या एकजुटीची परीक्षा घेतली गेली, तिथं ते अविचल राहिले.

भाजप आणि संघ दोन अत्यंत एकनिष्ठ, परिपूर्ण तयारी तसेच नियोजन बद्ध काम करण्याचा अनुभव असलेले संघटन. त्यांच्याशी वैचारिक,सोशल मिडिया आणि धोरणात्मक स्तरावरील मुकाबला सोपा नव्हता.. या झेन जी मंडळीनी त्यांच्या सोशल मिडियावरील अटॅकला परतवून लावण्यात वेळ न घालवता, सगळी शक्ती ‘जंतर मंतर’ येथील आंदोलन स्थळी एकवटली, हे दिसून आले. कोणत्याही टीकेला अथवा दबावाला त्यांनी शांतपणे परतवून लावले.
‘ गोदी मिडिया ‘असे नामकरण झालेल्या मेन स्ट्रीम मीडियातील इलेक्ट्रॉनिक मिडिया त्यांनी पहिल्या दिवसापासून बोथट केला तर स्वतःचा मिडिया न बनवता तेथे येणाऱ्या भेटी देणाऱ्या यू ट्यूबर्स, फ्री लान्स काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून मोजकीच माहिती देत राहिले, देशभरातील लोकांचे कुतूहल वाढवत राहिले.
सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि झेन जी यांच्या मागण्या यांतून भावनिक दबाव निर्माण होणार नाही याची जशी काळजी घेतली तशी त्यांचे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरचे सरकारी डावपेच परतवून लावले. इंटरनेट बंद, मेट्रो बंद. जितकी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, तितकी त्यांची एकजूट आणि निर्धार पक्का झाला.
वीस जुलै रोजी झालेल्या जोरदार लाठी हल्ल्यानंतर धैर्य आणि परस्पर विश्वास याचा भंग होऊ न देता शांतीपूर्ण पद्धतीने टिकून रहात आपल्यावर होणाऱ्या अप्रत्यक्ष सक्तीची ताकद त्यांनी मोडून काढली. जर वीस जुलै रोजी भीतीने किंवा परस्पर संशय, अविश्वास याची ठिणगी पडून महत्वाचे भिडू मानसिक दृष्ट्या मोडून पडले असते तर गडबड झाली असती. आंदोलन भरकटले असते.
राहुल गांधीची अनपेक्षित एन्ट्री आणि त्यांनी पंतप्रधान निवासा समोर धरणे धरणे, काँग्रेस खासदारांनी पुकारलेल्या या अनपेक्षित धरणे आंदोलनामुळे सरकारची काही अंशी झेन जी वरील पकड सैल झाली. झेन जी टीम मधील प्रमुख मंडळी सावरली आणि ते जे पी नड्डा यांच्या वागणुकीने, कारण त्यांनी भेटीसाठी तिष्ठत ठेवले तरी भावनिक न होता चर्चा सुरू करण्यात यशस्वी झाले. ही चर्चा नंतर आपल्या पटावर आणून ती ‘नॉन निगिशियेबल ‘ करण्यात यशस्वी ठरले. तहात ही आणि युद्धात ही त्यानी यश मिळविले.मोदी सरकारची ही मोठी पिछेहाट ठरली.
प्रधानाचा राजीनामा,आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहयोग आणि विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे,केले असल्यास मागे घेणे..छोटी परंतु सत्ताधारी पक्षासाठी बिकट स्थिती निर्माण करणारी ही अट ठरली. या सर्व पडद्याआड होत असलेल्या डावपेचात पंतप्रधान आणि अन्य नेत्यांना अनपेक्षित निर्णय घेण्याची कोणतीही संधी दिली नाही. पंतप्रधान धक्का तंत्रात तर गृहमंत्री डावपेच तसेच कोंडी करण्यात तरबेज, त्यांच्या बुद्धिबळाच्या चाली समजून घेत त्यांच्या वर मात केली.
या साऱ्यातून सामान्य नागरिकांनी काय साध्य केल? तर झेन जी यांची २६ दिवसाची ही लढाई, वांगचूक यांचे उपोषण या सगळ्या घटनांकडे सामान्य लोक लक्ष ठेवून होते. त्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल असे वाटत नव्हते. प्रधानमंत्री, गृहमंत्री यांची पूर्ण चुप्पी तसेच अन्य राजकीय पक्ष देखील द्विधा स्थितीत होते. सरकारची चुप्पी आणि वीस जुलै रोजी झालेली मारहाण, मुलींना दिलेली अमानूष वागणूक यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. लोक भावना झेन जी बरोबर आहे हे लक्षात येताच राहुल गांधी आणि त्यांची टीम तसेच अन्य पक्ष नेते सक्रिय होऊन गेले. त्यांना झेन जी च्या डायस वर यावे लागले.
त्यांनी देखील कोणाच्या आहारी न जाता आपली भूमिका निश्चित करून ती यशस्वी केली. या आंदोलनात तरुण मुलींची संख्या मोठी लक्षणीय होती. त्यांची खंबीरता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती दिसून आली.सर्वत्र. भाजपची देशातील ताकद अफाट. त्यांच्याशी मुकाबला अवघड. कोणत्याही स्थितीत झुकायचे नाही आणि अगोदर लक्षच द्यायचे नाही ही त्यांची मानसिकता परंतु झेन जी ने त्यांना संयमाचा कसोटीवर चितपट केलं.
भाजपपेक्षा संघ कार्यकर्त्याना ही लढाई दुःखी करून गेली. सोशल मीडियावरून त्यांनी जोरदार किल्ला लढविला. त्यात त्यांना यश मिळाले नाही. भाजपचे नेते आज ही मनमौला आहेत, त्यांना काहीही फरक पडलेला नाही. सामान्य माणूस यामुळे आनंदी झाला. या राज्यात, देशात लोक आंदोलन पुन्हा उभे राहू शकते, ही त्याची भावना वाढली. नीट पेपर फुटी हा आंदोलनाचा एक प्रमुख बिंदू असला तरी सामान्य लोकांमधून निर्माण झालेली अस्वस्थता, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, तरुण पिढीतील अस्वस्थता, त्यांच्या आत्महत्या, रोजगारासाठी स्थलांतर असे अनेक दुखरे मुद्दे आणि कडा त्या आंदोलनात होत्या, ज्या देशभरात विविध ठिकाणी झालेल्या मोर्च्यात दिसून आल्या. आता मोदी सरकारची कसोटी लागणार ती दुष्काळाशी लढताना, तसेच मंत्री मंडळ पुनर्रचना करताना..अनेक अडचणी समोर आहेत..











