बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी पक्ष नेतृत्वासह स्थानिक नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करत आपल्याविरोधात “पूर्वनियोजित कट” रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपले राजकारण संपवण्यासाठी एक टोळी सक्रिय असल्याचा दावा करत, “आता मी ठोस आणि ठासून राजकीय भूमिका घेणार,” असा इशारा दिला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी किशोर मासाळ यांची पक्षातून हकालपट्टी जाहीर केली. या कारवाईनंतर मासाळ यांनी पक्षाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हकालपट्टीबाबत प्रतिक्रिया देताना मासाळ म्हणाले, “माझी हकालपट्टी झाली हे समजले, पण माझा नेमका गुन्हा काय हे अजूनही सांगितले गेलेले नाही. पत्रकार परिषद घेऊन मी याबाबत प्रश्न विचारले होते. मात्र सुनावणी न करता थेट निकाल देण्यात आला. ही फाशी आधीच ठरलेली होती.”
त्यांनी पुढे आरोप केला की, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आपली नसून त्यामागे मोठे षडयंत्र आहे. “मला आधीच सांगितले गेले होते की तुमची ऑडिओ क्लिप व्हायरल केली जाईल. त्यामुळे हे सर्व प्री-प्लॅन असल्याचे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले. मासाळ यांनी स्वतःला राजकीय कटाचा बळी असल्याचे सांगत, “मला ट्रॅप करून फसवण्यात आले आहे. ती क्लिप कुठून आली, ती खरोखर माझी आहे का, ती बाहेर कोणी दिली आणि का दिली याचा तपास होईपर्यंत मी ती क्लिप माझी असल्याचे मान्य करणार नाही,” असे स्पष्ट केले. त्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी पोलिसांकडे केली होती; मात्र त्याची चौकशी न होता उलट स्वतःवरच गुन्हा दाखल झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
सुनेत्रा पवार यांच्यासमोर भूमिका मांडायची होती..
पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधला होता, मात्र आपण सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रत्यक्ष भूमिका मांडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे मासाळ यांनी सांगितले. “माझ्याविषयी कोण काय सांगितले आहे, हे मला ऐकायचे होते. त्यासाठी वेळ मागितली होती. पण मला तिथपर्यंत पोहोचूच दिले गेले नाही,” असा आरोप त्यांनी केला.
आत्मक्लेश आंदोलनालाही परवानगी नाही
आपल्यावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ ज्या ठिकाणी अजित पवार यांचा अपघात झाला होता, त्या ठिकाणी अन्नत्याग करून आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा आपण केली होती. त्याबाबत पोलिसांना पत्रही दिले होते. मात्र जीवितास धोका असल्याचे कारण देत पोलिसांनी आंदोलनास परवानगी नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
मलिदा गँगमध्ये नव्हतो, म्हणून लक्ष्य केले..
२०१६ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर २०१८ मध्ये अजित पवार यांनी स्वतः पक्षात घेतले आणि जबाबदारी दिली होती, अशी आठवण करून देत मासाळ म्हणाले, “राज्यभर आंदोलने केली, पक्षासाठी काम केले. पण त्याचे फळ आज हकालपट्टीच्या रूपाने मिळाले. मी मलिदा गँगमधला नव्हतो, त्यामुळेच लक्ष्य करण्यात आले.”
नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का?
नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याबाबत विचारले असता त्यांनी सहकारी नगरसेवकांवरही अप्रत्यक्ष टीका केली. “जे माझे सहकारी होते ते आतापर्यंत आडून गोळ्या मारत होते, आता उघडपणे समोर आले आहेत. अनेक नगरसेवक अस्वस्थ आहेत,” असा दावा त्यांनी केला.
माझे राजकारण संपणार नाही..
हकालपट्टी अपेक्षितच होती, असे सांगताना मासाळ यांनी थेट राजकीय आव्हान दिले. “माझे राजकारण संपवण्यासाठी गेम सुरू आहे. पण माझे राजकारण संपणार नाही. ६,५०० समर्थकांच्या बळावर मी पुढील राजकीय भूमिका घेणार आहे. माझ्यावर दबाव आणण्याचे, बदनाम करण्याचे आणि मला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता मी अधिक ठासून भूमिका मांडणार,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
बारामतीच्या राजकारणात किशोर मासाळ यांच्या हकालपट्टीनंतर सुरू झालेला हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.











