बारामती : बारामती शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. स्वतःला पुढारी म्हणवून घेणाऱ्या बारामतीच्या एका नगरसेवकाने एका असहाय्य विधवा महिलेचा छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून विनयभंग करणे, मारहाण करणे, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी या नगरसेवकाविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नगरसेवकाचे नाव किशोर आप्पासाहेब मासाळ (रा. सूर्यनगरी, जळोची, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी नगरसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असल्याने, ती विधवा आणि असहाय्य असल्याचा गैरफायदा आरोपी किशोर मासाळ याने घेतला. ओळख असल्याचा फायदा घेऊन आरोपीने वेळोवेळी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तिथे त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला.
“मी पुढारी आहे, तुम्हाला जगू देणार नाही…
महिलेने विरोध केला असता, आरोपीने “मी पुढारी आहे, तुम्हाला इथे सुखाने जगू देणार नाही. माझ्या खूप ओळखी आहेत, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन,” अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर, “तुझे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत, मी सांगेल तसेच तुला करावे लागेल,” असे म्हणून आरोपीने महिलेचा वारंवार पाठलाग केला आणि तिला लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली.
उद्योजकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा दबाव: आरोपीने पीडित महिलेला धमकावत, “तू बारामती येथील उद्योजकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून मला पैसे काढून दे, नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करीन,” अशी धक्कादायक धमकी दिली. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसात धाव घेतली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात किशोर आप्पासाहेब मासाळ याच्याविरुद्ध गु.र.नं. २५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३२(c), ७४, ७५, ७८, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत. बारामतीसारख्या नामांकित शहरात लोकप्रतिनिधी/नगरसेवकाकडून अशा प्रकारचे कृत्य समोर आल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.











