कानपूर : महान्यूज लाईव्ह
प्रेम, विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याच्या वचनाचा खरा अर्थ काय असतो याचे हृदयस्पर्शी उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपूर येथे पाहायला मिळाले. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभात झालेल्या भीषण आगीत वधूसह 12 जण भाजले. वधू गंभीर जखमी झाल्याने लग्न पुढे ढकलण्याची चर्चा सुरू झाली. मात्र वराने परिस्थितीपुढे हार न मानता थेट रुग्णालयातील बर्न वॉर्डमध्येच विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांनी या घटनेची तुलना ‘विवाह’ चित्रपटाशी केली आहे.
आनंदाच्या क्षणाला लागली आगीची झळ..
कानपूरमधील विकास आणि श्वेता यांच्या विवाहाची तयारी जोरात सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण होते. हळदीच्या कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने जमली होती. दरम्यान स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलिंडरच्या पाइपमधून गळती झाली आणि अचानक आग भडकली. आग इतक्या वेगाने पसरली की उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. आग विझवण्याच्या प्रयत्नात गरम तेलाने भरलेले भांडे उलटल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. या दुर्घटनेत वधू श्वेतासह तब्बल 12 जण भाजले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वधू खचली; लग्न पुढे ढकलण्याची केली विनंती..
या अपघातात श्वेता गंभीर भाजली होती. लग्नाच्या आदल्या दिवशीच आयुष्याला असे वळण लागल्याने ती मानसिकदृष्ट्याही हादरली होती. उपचारादरम्यान तिने कुटुंबीयांना लग्न पुढे ढकलण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःच्या अवस्थेमुळे वर आणि त्याच्या कुटुंबाला अडचण येऊ नये अशी तिची भावना होती. मात्र नियतीने वेगळेच काही ठरवले होते.
संकटात साथ सोडायची नाही; वराचा निर्धार
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाबाबत चर्चा सुरू झाली. अनेकांनी विवाह काही दिवस पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. मात्र वर विकासने कोणत्याही परिस्थितीत श्वेताची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला. लग्न फक्त आनंदाचे क्षण वाटून घेण्यासाठी नसते तर संकटातही एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी असते अशी भूमिका त्याने घेतल्याचे सांगितले जाते. त्याच्या या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबीयही भावूक झाले.
बर्न वॉर्डच बनला लग्नमंडप..
रुग्णालय प्रशासनाची विशेष परवानगी घेतल्यानंतर बर्न वॉर्डमध्येच विवाहसोहळा आयोजित करण्यात आला. ना भव्य मंडप, ना ढोल-ताशांचा गजर, ना मोठा सोहळा.. फक्त प्रेम, विश्वास आणि एकमेकांप्रती असलेली निष्ठा. डॉक्टर, नर्सेस, जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीय यांच्या उपस्थितीत विकासने श्वेताच्या कपाळावर सिंदूर लावला. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेतल्या. रुग्णालयातील हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले.
सोशल मीडियावर ‘रिअल लाईफ विवाह’ची चर्चा
घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच देशभरातून या नवदाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी विकासच्या निर्णयाला खऱ्या प्रेमाचे उदाहरण म्हटले. तर काहींनी हा तर खऱ्या आयुष्यातील ‘विवाह’ चित्रपट आहे अशी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विवाह’ चित्रपटातही लग्नाआधी आगीत वधू गंभीर भाजते आणि नंतर नायक तिच्याशी रुग्णालयात विवाह करतो. कानपूरमधील ही घटना त्याच कथानकाशी मिळतीजुळती असल्याने सोशल मीडियावर या प्रसंगाची मोठी चर्चा रंगली आहे.
प्रेमाची खरी व्याख्या ठरलेली घटना
आजच्या काळात नाती क्षुल्लक कारणांमुळे तुटताना दिसतात. अशा परिस्थितीत कानपूरमधील या घटनेने प्रेम, विश्वास आणि समर्पणाचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. जखमा भरून निघतील, वेदना कमी होतील मात्र संकटाच्या काळात दिलेली साथ आणि बर्न वॉर्डमध्ये बांधलेली ही लग्नगाठ आयुष्यभर स्मरणात राहील एवढे मात्र निश्चित.











