दौलतराव पिसाळ, वाई
वाई शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक ६ जवळील इंद्रजा आयकॉन परिसरातील एका बंद खोलीवर अन्न व औषध प्रशासन आणि वाई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २ लाख ५९ हजार ४८४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रकरणी संबंधित मालकाविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी अल्पना गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. इंद्रजा आयकॉन येथील एका बंद खोलीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
सदर खोलीला कुलूप असल्याने संबंधित मालक सतीश पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांनी खोलीत कोणताही प्रतिबंधित माल नसल्याचे सांगत सहकार्य करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत अधिकृत अधिकारांचा वापर करून कुलूप तोडण्यात आले.
खोली उघडल्यानंतर आत मोठ्या प्रमाणात आरएमडी पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल, एम सेंटेड टोबॅको, व्ही-१ टोबॅको तसेच शॉट ९९९ लक्झरी च्युइंग टोबॅको आदी विविध ब्रँडचा साठा आढळून आला. एकूण ८०.७४ किलो वजनाचा माल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीवर बंदी घातलेली असताना हा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४८/२०२६ दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित मालाचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि त्यामागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्वे करीत आहेत.











