दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात अवैधरित्या गर्भलिंग निदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपजिल्हा रुग्णालय दौंडचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी केडगाव परिसरात अवैध गर्भलिंग निदान सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हॉट्सॲपवरून प्रशासनाला प्राप्त झाला. संबंधित व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर हा प्रकार बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्यानंतर व्यापक जनहिताचा विचार करून दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी तत्काळ दखल घेत कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
डॉ. गुजर यांच्या तक्रारीनंतर आरोपी अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ अर्थात पीसीपीएनडीटी कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड करीत आहेत.
दरम्यान, स्त्री-भ्रूण हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या अवैध गर्भलिंग निदानाच्या प्रकारांवर प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.











