दौलतराव पिसाळ, वाई
वाई शहरातील रविवार पेठ परिसरात मोटारसायकल घेण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणाने स्वतःच्या आई, मावशी आणि काकावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे.
प्रशांत भगवान राजपुरे (वय २५, रा. कणूर, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनीता श्रीनिवास शेलार (वय ४२, रा. गजेंद्र अपार्टमेंट, भीमकुंड आळी, रविवार पेठ, वाई) यांच्या घरी त्यांची मोठी बहीण व आरोपीची आई रुपाली भगवान राजपुरे या आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी आरोपी प्रशांत याने फोन करून मोटारसायकल खरेदीसाठी पैशांची मागणी केली.
त्यावर रुपाली राजपुरे यांनी सध्या पैसे नसल्याचे सांगितले. यावेळी मावशी अनीता शेलार यांनीही आत्ता आईकडे पैसे नाहीत, असे सांगितल्याने आरोपी संतापला. तुझा आमच्या घरातील बाबीत बोलण्याचा काय अधिकार? असे म्हणत त्याने राग मनात धरला.
यानंतर प्रशांत राजपुरे हा चाकू घेऊन मावशीच्या घरी आला. त्याने प्रथम आईवर हल्ला केला. आईला वाचवण्यासाठी मावशी अनीता शेलार व त्यांचे पती श्रीनिवास शेलार हे मध्ये पडले असता आरोपीने खिशातून चाकू काढून श्रीनिवास शेलार यांच्या पोटात वार केला. तसेच आई आणि मावशीवरही सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने पथक रवाना केले. पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, हवालदार श्रीनिवास बिराजदार, नितीन कदम, हेमंत शिंदे, विक्रम धोत्रे व विशाल शिंदे यांनी विविध ठिकाणी छापे टाकून आरोपीचा शोध सुरू केला.
दरम्यान, खास खबर्यामार्फत आरोपी रविवार पेठ परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शहाणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे. या घटनेमुळे वाई शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास वाई पोलिस करत आहेत.










