मुंबई : कायद्याची अंमलबजावणी जिथून होते, त्याच मंत्रालय परिसरात बेकायदा ‘व्हीआयपीगिरी’चा खेळ रंगत असल्याचे समोर आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत धडक कारवाई करत तब्बल ८० वाहनांवरील लाल, निळे, पिवळे फ्लॅश लाईट्स आणि सायरन जप्त केले. संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, ही कारवाई मंत्रालय आणि विधानभवन परिसरातच झाल्याने प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नियम स्पष्ट असताना केवळ आपत्कालीन सेवा, कायदा-सुव्यवस्था यंत्रणा आणि अधिकृत शासकीय वाहनांनाच अशा दिव्यांचा वापर करण्याची परवानगी असताना खासगी वाहनांवर हे ‘प्रतिष्ठेचे प्रतीक’ म्हणून मिरवले जात असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रॅफिकमध्ये सवलत मिळवणे, टोल टाळणे किंवा स्वतःला ‘महत्त्वाची व्यक्ती’ दाखवणे, यासाठी या दिव्यांचा गैरवापर केला जात होता. मात्र, या प्रकारामुळे इतर वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि नियमभंगाला खतपाणी मिळते. सुरक्षा दृष्टीनेही हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुढील काळात आणखी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. बेकायदा दिवे किंवा सायरन आढळल्यास दंडासोबतच वाहनाची नोंदणी रद्द करण्याची शिफारस, तसेच गंभीर प्रकरणांत गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनीही अशा प्रकारांविरोधात जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेकायदा दिवे किंवा सायरन वापरणारी वाहने आढळल्यास त्याची माहिती किंवा छायाचित्र मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पाठवावे, असे सांगण्यात आले आहे.











