दौंड : महान्यूज लाईव्ह
भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानासमोर दौंड शहर व तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील खासदार, आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विधानसभा व लोकसभेत आवाज उठवून आरक्षण मिळवून द्यावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. आज रविवारी (ता. 4 ) आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी व सर्व राजकीय पक्षाच्या कार्यालयांसमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.
दौंड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कार्यालय, चौफुला येथील शिवसेना पक्ष कार्यालय, खुटबाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, तसेच राहू येथील भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी आक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दौंडच्या माजी आमदार रंजना कुल, माजी आमदार रमेश थोरात, भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा काचंन कुल यांना यावेळी देण्यात आले.











