मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी मांस विक्री करणाऱ्या हिंदू दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची योजना आखली आहे यावरून सध्या राज्यात चर्चा तर सुरू आहेत परंतु मल्हार हे नाव देण्यावरून अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या विश्वस्तांमध्येच दोन विचार प्रवाह निर्माण झाले आहेत एका विश्वस्ताचा या निर्णयाला पाठिंबा तर दुसऱ्याचा विरोध असे चित्र आहे.
मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्यासंदर्भातील नितेश राणे यांच्या निर्णयावर जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त श्री राजेंद्र खेडेकर यांनी हे नाव त्वरित बदलावे अशी मागणी केली आहे. श्री खेडेकर यांच्या मते श्री मल्हार म्हणजे खंडोबा देव हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि ते शाकाहारी आहे. या संदर्भात नितेश राणे यांना खेडेकर यांनी पत्र दिले आहे.
यामध्ये खेडेकर यांनी नमूद केले आहे की, मटन दुकानदारांना सर्टिफिकेटच्या माध्यमातून योग्यतेचा दर्जा देणे हा निर्णय योग्य आहे, जेणेकरून आपण कोणाकडून मटन घेत आहोत आणि ते किती विश्वासाला आहे हे निश्चित होईल त्याचबरोबर कुत्रे आणि गोमांस विक्रीला आळा बसेल. मात्र हे करताना एक मल्हार भक्त म्हणून एक सूचना आहे की या योजनेचे नाव त्वरित बदलावे. श्री मल्हार म्हणजे खंडोबा… अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे. देवाला फक्त पुरणपोळी किंवा चंपाषष्ठीच्या काळात वांग्याचे भरीत रोडगा नैवेद्य असतो. इतकेच नव्हे तर खंडोबा ही देवता मुक्या जनावरांवर नितांत प्रेम करणारी देवता आहे. म्हणून देवाच्या बाजूला नेहमी घोडा, कुत्रे, बैल आदी प्राण्यांचा सहवास असतो.
मंगेश घोणे यांचा मात्र पाठिंबा
मार्तंड देवस्थानचे दुसरे विश्वस्त मंगेश घोणे यांनी मात्र या मल्हार सर्टिफिकेटेशनचे स्वागत केले. खेडेकर यांनी भूमिका मांडली ती त्यांची वैयक्तिक असल्याचे मंगेश घोणे यांनी म्हटले असून मी स्वतः नितेश राणे यांची जाऊन भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहे आणि त्यांनी जय मल्हार नाव दिले आहे. त्याला माझा पाठिंबा असल्याची मत घोणे यांनी व्यक्त केले आहे.











