डॉ. संदेश शहा, इंदापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर चौकात असलेले स्मारक धुळीच्या साम्राज्यात असून स्मारकाची दुरावस्था झाली आहे. सकल मराठा शिवप्रेमींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर हे स्मारक काम होईपर्यंत झाकून ठेवून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र तशी व्यवस्था प्रशासन व कंपनीने केली नाही. निदान आता तरी प्रशासनाने योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
वाढलेली वाळलेली काटेरी झुडुपे, धुळीच्या थराने माखलेले, तडा गेलेले मावळ्यांचे पुतळे, उड्डाणपुलाच्या कामामुळे खचत चाललेली स्मारकालगतची एक एक इंच जागा, ही दुरावस्था वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकाची सध्या झाली आहे. एकेकाळी आकर्षक व देखण्या दिसणा-या या स्मारकामुळे इंदापूर शहराच्या वैभवात भर पडली. तसेच शिवछत्रपतींच्या इतिहासास त्यामुळे उजाळा मिळाला. मात्र आता स्मारकाची अवस्था पाहून शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे.
रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू झाले, त्यावेळी या स्मारकाची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल अशी हमी एन.पी.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या उड्डाणपुलाचे काम करणा-या कंपनीने घेतली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे स्मारक काढून टाकण्याचा प्रयत्न कंपनीने केला. मात्र तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगत हे स्मारक पूर्ववत ठेवले,मात्र त्यानंतर कंपनीने दिलेला शब्द गुंडाळून ठेवत, पुलाचे काम रेटून नेण्याचा प्रयत्न चालवल्याने स्मारकाच्या दुरावस्थेत वाढ होत आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे यांचे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वीरश्री मालोजीराजे यांच्या नावाचा चौक आहे. मागील काळात शासनाने तेथे मालोजीराजे यांचे आकर्षक स्मारक उभारले होते. सुंदर सजवलेला शानदार वर्तुळाकार कट्टा, त्याच्या शेजारी मधोमध मालोजीराजे यांची मुद्रा असणारा लांबरुंद चौथरा, त्याच्या सभोवती मावळ्यांच्या प्रतिकृती अशी सजावट असणारे स्मारक व भोवती असणारी फुलझाडे यामुळे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन मुंबई ते हैदराबादपर्यंत जाणा-या लोकांच्या दृष्टीला हे स्मारक सुखावून जात होते.
मध्यंतरीच्या काळात महामार्गाचे विस्तारीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर स्मारकाच्या दक्षिणेकडून उड्डाणपूल काढण्याचे ठरले. एन.पी.इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीकडे उड्डाणपूल उभारणीचे काम देण्यात आले. काम सुरु केल्यानंतर स्मारकाच्या भोवताली जमिनीची खोदाई व इतर कामे सुरु झाली. त्यामुळे हळूहळू स्मारकाची जागा कमी होवू लागली. कामात वापरात येणा-या बाबी व जमिनीला बसणारे हादरे यामुळे मावळ्यांच्या पुतळ्यांना तडे जावू लागले. धुळीची पुटे पुतळ्यांवर साठू लागली. स्मारकाचा परिसर धुळीने माखला.
हे लक्षात आल्यानंतर सकल मराठा समाजाने ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली. शासनाने कंपनीला समज दिल्यानंतर स्मारकाची कसलीही हानी होऊ दिली जाणार नाही, अशा पध्दतीने उड्डाणपुलाचे काम करु अशी हमी कंपनीने दिली. मात्र काम बेदरकारपणे जैसे थे तसेच सुरु ठेवले. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कंपनीच्या विरोधात निदर्शने करण्यात येवून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
एका ठेकेदार कंपनी च्या बेपर्वाई वृत्तीमुळे, जगाला आदर्श असणा-या छत्रपती शिवरायांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले स्मारकाची दुर्दशा, त्यांची ऐतिहासिक जहागिरी असणा-या इंदापूर मध्ये होत आहे, ही संतापजनक बाब आहे. त्यामुळे या स्मारकाच्या संवर्धना साठी आम्ही आक्रमक पणे प्रयत्न करू असा इशारा इंदापूर सकल मराठा समाजाच्या वतीने दिला आहे.











